व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Rahul Bondre : ‘वडिलांनी उभा केलेला सहकार स्वार्थासाठी बुडवला’; राहुल बोंद्रेंवर गंभीर...

Rahul Bondre : ‘वडिलांनी उभा केलेला सहकार स्वार्थासाठी बुडवला’; राहुल बोंद्रेंवर गंभीर आरोप

Cooperation built by his father was ruined for personal gain; serious allegations against Rahul Bondre : फेसबुक लाईव्हनंतर विरोधकांचा पलटवार, फसवणुकीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर राजकारण पेटले

Chikhli माजी आमदार राहुल बोंद्रे संचालित काही संस्थांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर चिखलीसह जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. गुन्हे दाखल झाल्यानंतर राहुल बोंद्रे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे आपल्यावरचे आरोप फेटाळून लावत कोणतीही फसवणूक केली नसल्याचा दावा केला होता. मात्र, त्यांच्या या दाव्याला प्रत्युत्तर देण्यासाठी विरोधकांनी श्रीराम नागरी पतसंस्थेत पत्रकार परिषद घेत बोंद्रे यांच्या कारभारावर गंभीर आरोप केले.

पत्रकार परिषदेत शैलेश गोंधणे, समाधान कणखर, अॅड. गजानन ठाकरे आणि श्याम वाकदकर यांनी राहुल बोंद्रे यांच्यावर टीकेची झोड उठवली. फेसबुक लाईव्ह करून आणि खोटे आरोप करून आपले पाप लपविता येणार नाही, असा आरोप करत त्यांनी बोंद्रे यांच्या एकूण सहकार क्षेत्रातील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

विरोधकांनी दावा केला की, स्वर्गीय तात्यासाहेब बोंद्रे आणि स्वर्गीय भास्करराव शिंगणे यांनी जिल्ह्यात सहकाराची मजबूत पायाभरणी केली होती. मात्र, राहुल बोंद्रे यांनी स्वतःच्या राजकीय आणि आर्थिक स्वार्थासाठी या संस्थांचा कारभार चुकीच्या पद्धतीने चालवून सहकार चळवळीचे नुकसान केले. अनुराधा साखर कारखाना, मुंगसाजी महाराज सहकारी सूतगिरणी, गंगोत्री दूध संकलन संस्था यांच्यासह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचेही नुकसान झाल्याचा आरोप त्यांनी केला.

Prakash Ambedkar : संकटाच्या काळात मोदी मौन बाळगतात, परदेश दौऱ्यांमध्ये व्यस्त असतात, प्रकाश आंबेडकरांची टीका

पत्रकार परिषदेत बोंद्रे यांच्या आर्थिक व्यवहारांबाबतही गंभीर दावे करण्यात आले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची न्यायप्रविष्ट जवळपास १०० कोटी रुपयांची वसुली राहुल बोंद्रे यांच्याकडे थकीत असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच २००८ च्या शेतकरी कर्जमाफी योजनेत अनुराधा बँकेकडे शेतकऱ्यांचे केवळ १० लाख ६४ हजार रुपये थकीत असताना शासनाकडून २ कोटी ३५ लाख रुपयांचा लाभ घेतल्याचा आरोपही करण्यात आला. अतिरिक्त मिळालेली रक्कम शासनाकडे परत करावी, अन्यथा ती व्याजासह वसूल करावी, अशी मागणी विरोधकांनी केली.

यावेळी विद्यमान आमदार श्वेता महाले यांच्यावर फेसबुक लाईव्हमध्ये करण्यात आलेल्या टीकेलाही विरोधकांनी उत्तर दिले. आमदार महाले यांनीच सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या माध्यमातून बोंद्रे यांच्या सूतगिरणीसाठी २.७५ कोटी रुपयांचा सरकारी हिस्सा मंजूर करून दिला होता, असा दावा करण्यात आला.

Us Iran peace deal : अमेरिका-इराण शांतता कराराची मोठी घोषणा; कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण

चिखलीची बारामती करण्याचे स्वप्न दाखविणाऱ्या नेतृत्वानेच मतदारसंघाला विकासापासून दूर नेल्याचा आरोप करत, शेतकरी आणि सहकार क्षेत्राचे नुकसान करणाऱ्यांनी आता आपल्या कर्माची फळे भोगण्यास तयार राहावे, असा इशाराही पत्रकार परिषदेत देण्यात आला.
दरम्यान, पत्रकार परिषदेत करण्यात आलेले सर्व आरोप संबंधित नेत्यांचे असून, याबाबत राहुल बोंद्रे यांची बाजू अद्याप समोर आलेली नाही.

error: Content is protected !!