Dhanorkar Emerges Victorious in Chandrapur Civic Battle; Wadettiwar Camp’s Group Leader Ousted : खासदार प्रतिभा धानोरकरांचे ‘ऑपरेशन वडेट्टीवार’ यशस्वी; महापालिकेतील गटनेताच बदलला
Nagpur : चंद्रपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीने आता अत्यंत टोकाचे वळण घेतले असून लोकसभा निवडणुकीपासून धुमसत असलेल्या वादाचा मोठा स्फोट चंद्रपूर महापालिकेत झाला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांना थेट धोबीपछाड दिला असून त्यांनी राबवलेले ‘ऑपरेशन वडेट्टीवार’ पूर्णपणे यशस्वी ठरले आहे.
महापालिकेतील वडेट्टीवार गटाचे गटनेते राजेश अडूर यांना थेट पदावरून खेचण्यात आले असून, त्यांच्या जागी आता धानोरकर गटाचे सुरेंद्र अडबाले हे काँग्रेसचे नवे गटनेते बनले आहेत आणि नागपूरच्या विभागीय आयुक्तांनीसुद्धा बहुमताचा आदर करत या नियुक्तीच्या आदेशावर शिक्कामोर्तब केले आहे.
विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील वर्चस्वाच्या वादातून खासदार समर्थकांनी थेट नागपूर विभागीय आयुक्तांचे कार्यालय गाठत वडेट्टीवार गटाला हा मोठा राजकीय धक्का दिला. चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचे एकूण २७ नगरसेवक असून, या सत्तासंघर्षात खासदार धानोरकर यांनी वडेट्टीवार गटाला मोठे खिंडार पाडत तब्बल १६ नगरसेवक आपल्या बाजूने खेचले आणि वडेट्टीवार यांच्या गटात केवळ ११ नगरसेवक शिल्लक ठेवले.
या सर्व १६ नगरसेवकांनी नागपुरात येऊन शपथपत्राद्वारे सुरेंद्र अडबाले यांच्या नियुक्तीचा अर्ज सादर केला होता, ज्यावर वडेट्टीवार समर्थकांनी तीव्र आक्षेप घेतला मात्र कायद्यानुसार बहुमताच्या बळावर गटनेता बदलता येत असल्याने धानोरकर गटाचे पारडे जड झाले आणि आयुक्तांनी हा निर्णय दिला.
तत्पूर्वी, मावळते गटनेते राजेश अडूर यांनी सर्व नगरसेवकांना व्हीप बजावून आपले पद वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न केला होता, मात्र तो अपयशी ठरल्याने आता त्यांनी या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे, असे असले तरी तूर्तास तरी खासदारांनी ही बाजी मारल्याचे स्पष्ट दिसत आहे.
Samajwadi party split : ठाकरे गटानंतर समाजवादी पक्षातही मोठ्या फुटीची चर्चा
वास्तविक पाहता, चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापन करतानाही या दोन्ही नेत्यांमधील वाद विकोपाला गेले होते आणि हा वाद थेट दिल्लीपर्यंत पोहोचला होता. त्यावेळी दिल्लीच्या नेत्यांनी मध्यस्थी करत महापौरपद खासदार समर्थकाला, तर स्थायी समिती सभापती आणि गटनेता ही दोन पदे विजय वडेट्टीवार यांच्या समर्थकांना देण्याचे निश्चित केले होते, मात्र काँग्रेसकडे संख्याबळ अधिक असतानाही या अंतर्गत भांडणामुळे त्यांना सत्ता स्थापन करता आली नाही आणि याचा अचूक फायदा भाजपने उठवत, बहुमत सिद्ध करण्याएवढे संख्याबळ नसतानाही उद्धव सेनेच्या मदतीने आपला महापौर बसवला. हातची सत्ता गेल्यानंतरही काँग्रेसमधील हा वाद शमला नाही आणि गटनेतेपदावरून सुरू झालेल्या नव्या वादातून खासदार धानोरकर गटाने थेट गटनेता बदलण्याचा हा धाडसी निर्णय घेतला.
Shivsena rebellion : भुजबळ ते शिंदे… वैयक्तिक नाराजीपासून ‘ऑपरेशन पॉलिटिक्स’पर्यंतचा प्रवास !
या दोन्ही नेत्यांमधील वादाची ठिणगी लोकसभा निवडणुकीच्या वेळेस पडली होती, जेव्हा माजी खासदार बाळू धानोरकर यांच्या अकाली निधनानंतर या जागेवर विजय वडेट्टीवार यांनी दावा करत आपली मुलगी शिवानी वडेट्टीवार यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. मात्र, तत्कालीन आमदार प्रतिभा धानोरकर यांनी स्वतः लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आणि तिकीट मिळाल्यानंतर त्या मोठ्या मताधिक्याने विजयीही झाल्या, पण तेव्हापासून या दोन्ही नेत्यांमध्ये बिनसले ते कायमचेच.
हा वाद त्यानंतर विधानसभा, महापालिका आणि अलीकडेच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीतही उघडपणे समोर आला असून, यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसमध्ये आता उघडपणे दोन गट पडले आहेत आणि आगामी काळात हा संघर्ष आणखी काय वळण घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








