Rajeev potdar directly attacks sunil kedar on very first day : पोतदारांच्या विजयाचा जल्लोष नव्हे, दोन कट्टर शत्रूंमधील युद्धाचा दुसरा अंक
Nagpur नागपूर विधान परिषद मतदारसंघातून भाजप-महायुतीचे उमेदवार डॉ. राजू पोतदार यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवत थेट विधान परिषदेत धडक मारली आहे. या ऐतिहासिक विजयानंतर भाजप गोटात, खासकरून सावनेर विधानसभा मतदारसंघात कमालीचा जल्लोष सुरू आहे. मात्र, हा विजय केवळ एका जागेपुरता मर्यादित नसून, नागपूरच्या राजकारणातील दोन कट्टर शत्रूंमधील युद्धाचा हा दुसरा अंक मानला जात आहे. निवडून येताच डॉ. पोतदार यांनी पुन्हा एकदा नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (NDCC) घोटाळ्याचा विषय छेडून काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सुनील केदार यांना थेट इशारा दिला आहे.
सुनील केदार आणि डॉ. राजू पोतदार यांचे राजकीय वैर संपूर्ण जिल्ह्याला ठावूक आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत केदारांचा पराभव करण्याचा विडाच पोतदारांनी उचलला होता. मी स्वतः निवडणूक लढणार नाही, पण केदारांचा काटा काढण्यासाठी ‘चाणक्य’ची भूमिका बजावणार, अशी घोषणा पोतदारांनी आधीच केली होती. त्यानुसार, केदार आणि देशमुख घराण्याचे जुने वैर लक्षात घेऊन भाजपने आशिष देशमुख यांना मैदानात उतरवले होते. एकेकाळी रणजित देशमुख यांचा अपक्ष लढून पराभव करणाऱ्या केदारांना यंदा घेरण्यासाठी पोतदार आणि देशमुखांनी आधीच तगडी फिल्डिंग लावली होती. यामध्ये केदारांचे ‘राईट हँड’ मानले जाणारे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांना निवडणुकीपूर्वीच फोडण्यात आले होते. या दरम्यान जिल्हा बँक घोटाळ्यात न्यायालयाने केदारांना दोषी ठरवल्यामुळे त्यांना ६ वर्षे निवडणूक लढण्यास बंदी आली. केदारांनी सहानुभूती गोळा करत आपल्या पत्नीला रिंगणात उतरवले, मात्र पोतदार आणि देशमुख यांच्या चक्रव्यूहापुढे केदारांचे काही चालले नाही आणि सावनेरमध्ये भाजपचे आशिष देशमुख आमदार झाले.
या विधानसभा पराभवानंतर लागलीच झालेल्या विधान परिषद निवडणुकीतही केदारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात केदारांचीच मुख्य भूमिका होती. तसेच, बुटीबोरी नगरपालिकेतील गोंडवाणा गणतंत्र पार्टीच्या बॅनरवर निवडून आलेले काँग्रेस समर्थित २० नगरसेवक हे केदारांचेच खंदे पाठीराखे होते. मात्र, निवडणुकीपूर्वीच भाजपने या सर्व नगरसेवकांना आपल्याकडे वळवून केदारांना उघड चॅलेंज दिले होते. त्यावर पलटवार करताना केदारांनी, केवळ बैठका आणि भेटीगाठी घेतल्याने मतदान होत नाही, आमचे नगरसेवक आत जाऊन काँग्रेसलाच शिक्का मारतील, ‘आगे आगे देखो होता है क्या’ असा सूचक इशारा भाजप व पोतदारांना दिला होता. मात्र, पोतदारांच्या आजच्या विक्रमी विजयाने केदारांचा हा दावा सपशेल फोल ठरवला असून, त्यांच्याच बालेकिल्ल्यात भाजपने त्यांना धोबीपछाड दिली आहे.
Operation Tiger : ‘माझे नेते उद्धव ठाकरेच’; राजकीय चर्चांवर सिद्धार्थ खरात यांचा पूर्णविराम
दरम्यान, आमदार आशिष देशमुख यांनी आधीच बँक घोटाळ्याच्या वसुलीसाठी आंदोलने करून मोठे रान उठवले आहे, आता त्यांना साथ देण्यासाठी नवनिर्वाचित आमदार डॉ. राजू पोतदार मैदानात उतरले आहेत. विजयी होताच पोतदारांनी, आम्ही आता आमचे संपूर्ण लक्ष जिल्हा बँकेच्या घोटाळ्यावर केंद्रित करणार असल्याचे सांगत केदारांना थेट इशारा दिला आहे. सावनेर विधानसभेत केदारांचा राजकीय पराभव केल्यानंतर आता पोतदार आणि देशमुख ही जोडी मिळून केदारांना बँक घोटाळ्याच्या प्रकरणात पूर्णपणे घेरण्याच्या तयारीत असल्याने, नागपूरच्या राजकारणात हा संघर्ष आगामी काळात अधिकच टोकदार होणार हे स्पष्ट आहे.








