What is the need to print the TET question papers outside the state?; Sudhir Mungantiwar questions the Maharashtra government : प्रश्नपत्रिका बाहेरच्या राज्यात छापण्याची गरज काय? शासनाला थेट सवाल
Mumbai शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी प्रकरणावर आज महाराष्ट्र विधानसभेत झालेल्या चर्चेत माजी मंत्री तथा ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारसमोर महत्त्वाचा धोरणात्मक मुद्दा उपस्थित केला. भविष्यात अशा घटना कायमस्वरूपी रोखायच्या असतील तर शिक्षक पात्रता परीक्षेसह राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिका महाराष्ट्रातच छापण्याचा निर्णय शासनाने घ्यावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी या प्रकरणी सभागृहात सविस्तर निवेदन सादर केल्यानंतर चर्चेत सहभागी होत मुनगंटीवार म्हणाले की, महाराष्ट्रावर संपूर्ण देशाचा विश्वास आहे. नाशिकमध्ये देशाच्या चलनी नोटा छापल्या जातात, मग राज्यातील स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिका महाराष्ट्राबाहेर छापण्याची गरज काय? जर बाहेरच्या राज्यात छपाईमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असेल, तर यापुढे प्रश्नपत्रिका महाराष्ट्रातच छापण्याचा शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा प्रत्येक अधिवेशनात पेपरफुटीच्या घटनांवर चर्चा करण्याची वेळ येत राहील.
Sudhir mungantiwar : मोरवा येथील चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी मुनगंटीवार आक्रमक
पेपरफुटीचा प्रयत्न वेळेत उधळून लावणाऱ्या पोलिसांचेही त्यांनी विशेष कौतुक केले. गुप्त माहितीच्या आधारे तातडीने कारवाई करून आरोपींना अटक करण्यात आली. ही कारवाई झाली नसती तर परीक्षा झाल्यानंतर हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असते, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, २८ जून २०२६ रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेची प्रश्नपत्रिका विक्रीसाठी आणली जाणार असल्याची माहिती २७ जून रोजी पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सापळा रचून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेली प्रश्नपत्रिका ही टीईटी परीक्षेचीच असल्याची खात्री शिक्षण विभागाने केली.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमे, महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्गास प्रतिबंध अधिनियम, २०२४ तसेच महाराष्ट्र सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले असून तपासासाठी बिहार, हरियाणा आणि दिल्ली येथे स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत.
शिक्षणमंत्र्यांनी पुढे सांगितले की, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. आवश्यक असल्यास संघटित गुन्हेगारीविरोधी कायद्यांतर्गत कारवाईचाही विचार सुरू आहे. टीईटीची फेरपरीक्षा उमेदवारांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने घेतली जाईल. तसेच टीईटीसह इतर सर्व महत्त्वाच्या परीक्षा भविष्यात ऑनलाइन आणि अधिक सुरक्षित पद्धतीने घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
चर्चेचा समारोप करताना मुनगंटीवारांनी शासनाने या घटनेतून धडा घेत प्रश्नपत्रिका छपाईपासून परीक्षा व्यवस्थापनापर्यंत संपूर्ण प्रक्रियेत सुरक्षा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली.








