व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Nagpur municipal corporation : सर्वपक्षीय एकमत; नगरसेवकांना आता ३५ लाखांचा वॉर्ड निधी

Nagpur municipal corporation : सर्वपक्षीय एकमत; नगरसेवकांना आता ३५ लाखांचा वॉर्ड निधी

Corporators to get 35 lakhs ward fund from this year : महापौर अन् उपमहापौरांना कोट्यवधींचे प्रावधान; मनपा बजेटवर ११ तास घमासान चर्चा

Nagpur नागपूर महानगरपालिकेच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पावर सुमारे ११ तास झालेल्या घमासान चर्चेनंतर नगरसेवकांच्या वॉर्ड विकास निधीत वाढ करून तो ३५ लाख रुपये करण्यात आला आहे. यासोबतच महापौर निधी २० कोटी रुपये तर उपमहापौर निधी १० कोटी रुपये देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

महापालिकेच्या या अर्थसंकल्पावर सोमवारी सकाळी ११ वाजता चर्चेला सुरुवात झाली आणि रात्री ११ वाजता ही वादळी चर्चा संपली. शहरातील वाढती लोकसंख्या आणि घरांची वाढलेली संख्या लक्षात घेता, पूर्वी मिळणाऱ्या २० लाखांच्या निधीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी विरोधकांसह सर्वच नगरसेवकांनी लावून धरली होती.

विद्यमान स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे यांनी यात आधी ५ लाखांची वाढ केली होती, मात्र सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी मांडलेल्या सुधारित प्रस्तावाला अखेर बहुमताने मंजुरी देण्यात आली. या महत्त्वपूर्ण चर्चेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या गटनेत्यांसह एकूण ७६ नगरसेवकांनी सहभाग नोंदवला.
चर्चेच्या शेवटी सत्तापक्ष नेते नरेंद्र बोरकर यांनी अर्थसंकल्पाचे समर्थन करताना हा शहराच्या विकासाचा अर्थसंकल्प असून यातील सर्व तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला.

Chandrashekhar bawankule : भाजप आणि महायुतीत भांडणे लावू नका, आधी स्वतःचे घर सांभाळा; चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना थेट टोला

मनपाचे महसूल वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याचे सांगत त्यांनी प्रत्येक नगरसेवकासाठी वॉर्ड विकास निधी २५ लाख रुपये करण्याची, तर महापौर निधी २० कोटी व उपमहापौर निधी १० कोटी रुपये करण्याची मागणी प्रामुख्याने लावून धरली. याशिवाय स्लम भागातील चोकेजच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक झोनमध्ये ‘सक्शन प्लस जेटिंग मशीन’ उपलब्ध करणे, गरोबा मैदान येथे अत्याधुनिक ई-लायब्ररी सुरू करणे, तसेच शहरातील ७५ मैदाने व ७५ उद्यानांचा विकास करण्याची मागणी त्यांनी केली. परिवहन विभागासाठी २०० कोटी रुपयांचे प्रावधान करण्याची आणि विमानतळाजवळील डॉ. हेडगेवार चौकाचे सौंदर्यीकरण करण्याची महत्त्वपूर्ण सूचनाही त्यांनी यावेळी मांडली. नागपूर शहराच्या विकासासाठी आणि मनपाच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे यांनी दिली.

अर्थसंकल्पाच्या चर्चेला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, मनपाचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. यासाठी मालमत्ता कराद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी कर संकलकांना आता ‘पीओएस’ (POS) मशीन दिल्या जाणार असून, यामुळे घरोघरी जाऊन डिजिटल पद्धतीने कराची वसुली करणे सुलभ होईल. या कर वसुलीच्या मोहिमेत सर्व नगरसेवकांचे सहकार्य घेतले जाईल. यासोबतच, पर्यावरणपूरक पाऊल म्हणून मनपाच्या सर्व इमारतींवर ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ करण्यात येणार असून शहरातील दहनघाटांचाही कायापालट केला जाईल. शहराचा विकास शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे दाणी यांनी स्पष्ट केले.

Vishwas nangre patil : होय, संघाच्या कार्यक्रमाला गेलो, त्यात नियमबाह्य काय?; नवनियुक्त पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी भूमिका केली स्पष्ट

दुसरीकडे, अर्थसंकल्पावर तोफ डागताना विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर म्हणाले की, शहराच्या विकासासाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम मोठ्या निधीची आवश्यकता असते. परंतु, या अर्थसंकल्पात निधीची मोठी कमतरता भासणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. मनपाच्या वास्तविक आवकच्या तुलनेत हा अर्थसंकल्प अवाजवी आणि फुगवून सांगण्यात आला आहे. मनपाची ‘डक्टिंग पॉलिसी’ हा उत्पन्नाचा एक चांगला स्रोत होऊ शकतो, त्याकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच वाढती महागाई आणि विकासकामांचा खर्च पाहता वॉर्ड निधी २५ लाखांवरून थेट ५० लाख रुपये करण्यात यावा, अशी आग्रही मागणी विरोधी पक्षनेत्यांनी यावेळी केली.

error: Content is protected !!