Minister Ashish Shelar Says, Sudhir Bhau Embodies Strength, Commitment, and Leadership Dedicated to Public Service : लोकहिताच्या मुद्द्यांवरील अभ्यासपूर्ण भूमिकेचा सभागृहात गौरव
Mumbai : विधिमंडळातील महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध (सुधारणा) विधेयक यावरील चर्चेदरम्यान राज्याचे माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याचा मंत्री आशिष शेलार यांनी गौरव केला. चर्चेला उत्तर देताना शेलार यांनी मुनगंटीवार यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीचे आणि जनतेच्या प्रश्नांबाबत असलेल्या संवेदनशील भूमिकेचे विशेष कौतुक केले.
चर्चेदरम्यान मुनगंटीवार यांनी प्रशासनातील विलंब, अधिकाऱ्यांची उत्तरदायित्वाची भावना, शेतकरी, कष्टकरी, गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींसह विकासाशी संबंधित विविध मुद्दे सभागृहात उपस्थित केले. कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकांना वेळेत न्याय मिळणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले. त्यांच्या मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण मांडणीची दखल घेत उत्तर देताना आशिष शेलार यांनी संघटना, मंत्री आणि सहकारी म्हणून काम करताना मुनगंटीवार यांचे कार्य जवळून अनुभवण्याची संधी मिळाल्याचे सांगितले.
यावेळी शेलार म्हणाले, “सुधीरभाऊ बलवान, धैर्यवान, बुद्धिमान, चारित्र्यवान, दयावान, क्षमावान, कर्तव्यवान, सामर्थ्यवान, निष्ठावान आणि प्रतिभावान आहेत.” सार्वजनिक जीवनात त्यांनी जपलेली कार्यपद्धती, विषयांचा सखोल अभ्यास, निर्णयक्षमता आणि लोकहितासाठी सातत्याने घेतलेली भूमिका यांचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. जनतेच्या प्रश्नांबाबत त्यांची असलेली बांधिलकी ही अनेक लोकप्रतिनिधींसाठी प्रेरणादायी असल्याचेही शेलार यांनी नमूद केले.
शेलार यांच्या या गौरवोद्गारांनंतर सभागृहात अनेक सदस्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. चर्चेच्या वातावरणातही एका ज्येष्ठ लोकप्रतिनिधीच्या कार्याची नोंद घेत त्यांचा गौरव करण्यात आल्याने हा क्षण विशेष ठरला.
सुधीर मुनगंटीवार यांनी विधिमंडळात सातत्याने जनहिताचे प्रश्न अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडत सरकारचे लक्ष वेधण्याचे काम केले आहे. विविध विधेयके, अर्थसंकल्प, प्रशासन, शेती, पर्यावरण, उद्योग आणि पायाभूत सुविधांसह अनेक विषयांवर त्यांनी सातत्याने सखोल भूमिका मांडली आहे. प्रभावी मांडणी, अभ्यासू वृत्ती आणि लोकहिताला प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख विधिमंडळात निर्माण झाली असून, शेलार यांच्या वक्तव्यातून त्याच कार्याची पुन्हा एकदा दखल घेतली गेली.








