maharashtra-rain-red-alert-mumbai-konkan-heavy-rain-weather-update : ५ जिल्ह्यांना रेड अलर्ट हवामान विभागाच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना
Mumbai : राज्यात मान्सूनने जोरदार पुनरागमन करत बहुतांश भागात मुसळधार पावसाची हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकण पट्ट्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय हवामान विभागाने ५ जुलैपासून पुढील ४८ तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचा इशारा देत अनेक जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नदी-नाल्यांच्या परिसरापासून दूर राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई महानगर प्रदेशात रविवारी दिवसभर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई शहर, उपनगर, ठाणे आणि पालघरमध्ये काही ठिकाणी अल्पावधीत अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने रेड अलर्ट लागू करण्यात आला आहे. यामुळे सखल भागात पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे आणि रेल्वे तसेच रस्ते वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घाटमाथा परिसरात दरडी कोसळण्याचा धोका वाढू शकतो, त्यामुळे या भागातील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Raj Thackeray : ‘लोकांच्या मृत्यूवर आमदार हसतो, ही असंवेदनशीलता असह्य’
पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम राहणार असून पुणे, सातारा आणि घाटमाथा परिसरात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून डोंगराळ भागात प्रवास करणाऱ्यांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र नाशिकच्या घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
दरम्यान, काही भागांत पावसाने तात्पुरती विश्रांती घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. पश्चिम उपनगरातही पावसाने काही काळ उसंत घेतली असून रायगडमध्येही पावसाचा वेग कमी झाल्याचे दिसून आले आहे. विदर्भातील बुलढाणा, अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी पावसाची विश्रांती मिळाली आहे.
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान
गोंदिया जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे जून महिन्यातील पावसाची तूट मोठ्या प्रमाणात भरून निघाली आहे. जूनमध्ये केवळ ५३.७ मिमी पावसाची नोंद झाली होती. मात्र ३० जून ते ४ जुलै या कालावधीत तब्बल २४०.४ मिमी पावसाची नोंद झाल्याने शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गोंदिया, आमगाव, गोरेगाव आणि सालेकसा तालुक्यांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टीची नोंद झाली असून नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ होत असली तरी परिस्थिती अद्याप समाधानकारक झालेली नाही. सध्या राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये एकूण १० हजार ४४३ दशलक्ष घनमीटर म्हणजेच एकूण क्षमतेच्या २५.५६ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा ४९.७६ टक्के होता.
Eknath shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर
विभागनिहाय आकडेवारीनुसार अमरावती विभागात ४१.०४ टक्के आणि नागपूर विभागात ३९.०७ टक्के पाणीसाठा आहे. कोकण विभागातील धरणांमध्ये ३२.५२ टक्के, छत्रपती संभाजीनगर विभागात २४.७६ टक्के आणि नाशिक विभागात २५.४६ टक्के पाणीसाठा नोंदवला गेला आहे. सर्वाधिक चिंताजनक परिस्थिती पुणे विभागात असून तेथील धरणांमध्ये केवळ १६.१३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
हवामान विभागाने पुढील दोन दिवस राज्यातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता कायम असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवावे, पूरग्रस्त किंवा नदीकाठच्या भागात जाणे टाळावे, तसेच आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
__








