व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home देश-विदेश Asiatic Society : एशियाटिक सोसायटीच्या अध्यक्षपदी डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

Asiatic Society : एशियाटिक सोसायटीच्या अध्यक्षपदी डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

asiatic-society-mumbai-election-vinay-sahasrabuddhe-elected-president : निकालानंतर ‘जय श्रीराम’ आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणा

Mumbai : मुंबईतील दोन शतकांहून अधिक वैभवशाली इतिहास असलेल्या ‘दि एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’च्या निवडणुकीत ‘एशियाटिक टुमारो’ गटाने एकतर्फी विजय मिळवत संस्थेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भारतीय जनता पक्षाचे माजी राज्यसभा सदस्य डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखालील या गटाने सर्व १९ जागांवर विजय मिळवत निवडणुकीत दणदणीत यश संपादन केले. निकाल जाहीर होताच समर्थकांनी ‘जय श्रीराम’ आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

या निवडणुकीत नामवंत पत्रकार आणि काँग्रेसचे माजी राज्यसभा सदस्य कुमार केतकर यांच्या नेतृत्वाखालील ‘सेव्ह एशियाटिक’ गटाचा पराभव झाला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांना ३४९ मते मिळाली, तर कुमार केतकर यांना १५७ मतांवर समाधान मानावे लागले.

एकूण १९ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात होते. संस्थेच्या २,५३० पात्र मतदारांपैकी केवळ ५०८ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. मुसळधार पाऊस आणि सभासदांचा तुलनेने कमी प्रतिसाद यामुळे मतदानाची टक्केवारी मर्यादित राहिली. तरीही निकालात ‘एशियाटिक टुमारो’ गटाने सर्व जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले.

Modi Cabinet : मोदी मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा; महाराष्ट्राला तीन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता

ही निवडणूक सुरुवातीपासूनच चर्चेत होती. वर्ष २०२४ मध्ये होणारी निवडणूक मतदार यादीवरील वादामुळे तब्बल दहा महिने लांबली होती. निवडणूक दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. निवडणुकीदरम्यान राज्यातील सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप होत असल्याचा आरोप ‘सेव्ह एशियाटिक’ गटाकडून करण्यात आला होता. मात्र मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रात्री मतमोजणी पार पडली आणि निवडणूक निर्णय अधिकारी किशोर तळोकर यांनी विजयी उमेदवारांची अधिकृत घोषणा केली.

नवीन कार्यकारिणीत डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी चंद्रप्रकाश द्विवेदी, नितीश भारद्वाज, रमेश पतंगे आणि संजय देशमुख यांची निवड झाली आहे. विवेक गणपुळे यांच्याकडे सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कार्यकारी सदस्य म्हणून माधव भंडारी, मल्हार कुलकर्णी, प्राची मोघे, प्रमोद बापट, राजेश बेहरे आणि व्ही. एम. चक्रवर्ती यांची निवड झाली आहे. तसेच छाननी समितीवर अभिजित मुळे, अमोल जाधव, दत्तात्रय पंचवाघ, माधवी नरसाळे, मल्हार गोखले, स्नेहा नगरकर आणि उमंग काळे यांची निवड करण्यात आली आहे.

विजयानंतर बोलताना डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी एशियाटिक सोसायटीच्या उपक्रमांचा विस्तार मुंबई शहरापुरता मर्यादित न ठेवता उपनगरांपर्यंत करण्याचा मानस व्यक्त केला. संशोधन, वाचनसंस्कृती आणि प्राच्यविद्या अभ्यास अधिक व्यापक स्तरावर पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.

Rain Alert : महाराष्ट्रात पावसाचा कहर! पुढील ४८ तास अत्यंत महत्त्वाचे

डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमधून केली. ते रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष राहिले असून भारतीय जनता पक्षाचे माजी राज्यसभा सदस्य आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. यापूर्वी ते एशियाटिक सोसायटीचे उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. ‘विकास की राजनीति’ या विषयावरील त्यांचे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.

या निकालामुळे मुंबईतील ऐतिहासिक आणि प्रतिष्ठित संशोधन संस्थेच्या नेतृत्वात मोठा बदल झाला असून आगामी काळात एशियाटिक सोसायटीच्या कार्यपद्धती, संशोधन उपक्रम आणि संस्थेच्या विस्ताराबाबत नव्या कार्यकारिणीची भूमिका काय असेल, याकडे शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

___

error: Content is protected !!