व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र SIR program : एसआयआरसाठी शिक्षक कार्यमुक्त; शाळा आणि निवडणूक कामकाजात बीएलओंची कोंडी

SIR program : एसआयआरसाठी शिक्षक कार्यमुक्त; शाळा आणि निवडणूक कामकाजात बीएलओंची कोंडी

Teachers relieved for SIR; BLOs caught in a bind between schools and election duties : निवडणूक आयोगाचा आदेश, शिक्षण विभागासमोर पेच; मेहकरात २४२ शिक्षक दुहेरी जबाबदारीत

Dongao राज्यात एकीकडे शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली असताना, दुसरीकडे निवडणूक विभागाने शिक्षकांवर टाकलेल्या अतिरिक्त जबाबदाऱ्यांमुळे शिक्षण व्यवस्थेतील विसंगती पुन्हा एकदा समोर आली आहे. एसआयआरच्या कामासाठी नेमणूक झालेल्या बीएलओ शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश निवडणूक विभागाने दिले, मात्र त्याच वेळी शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या अध्यापनाचे नियोजन कसे करायचे, हा गंभीर प्रश्न शिक्षण विभागासमोर उभा राहिला आहे. परिणामी, शिक्षक, शिक्षण विभाग आणि पालक या तिन्ही पातळ्यांवर संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मेहकर तालुक्यात २४२ शिक्षकांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ३० जूनपासून शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या दाखल-खारीज नोंदी, नवीन प्रवेश, शाळाबाह्य विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करणे, तसेच काही शिक्षकांना बदललेल्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण अशा महत्त्वाच्या शैक्षणिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत आहेत. अशा स्थितीत शिक्षकांना एसआयआरच्या कामासाठी कार्यमुक्त केल्यास शाळेतील दैनंदिन अध्यापन आणि प्रशासकीय कामकाजावर थेट परिणाम होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

DPC akola : जिल्हा नियोजन समितीवर भाजपचे वर्चस्व; बच्चू कडू समर्थकांना पुन्हा डावलले

या पार्श्वभूमीवर मेहकरचे गटशिक्षणाधिकारी यांनी निवडणूक विभागाला पत्र देऊन मार्गदर्शन मागितले आहे. शिक्षकांना निवडणूक कामासाठी पूर्णवेळ पाठवायचे, की विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था करायची, याबाबत शिक्षण विभाग स्वतःच संभ्रमात असल्याचे या पत्रातून स्पष्ट होते. एका बाजूला निवडणूक विभागाकडून एसआयआरचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी दबाव वाढवला जात आहे, तर दुसऱ्या बाजूला शिक्षक शाळेत अनुपस्थित राहिल्यास शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होणार, याची चिंता शिक्षण अधिकाऱ्यांना भेडसावत आहे.

या संपूर्ण प्रकरणाने राज्यातील प्रशासनाच्या समन्वयाचा अभाव पुन्हा अधोरेखित केला आहे. शाळा सुरू असताना मोठ्या प्रमाणात शिक्षकांना निवडणूक कामासाठी वळविणे, हा निर्णय शिक्षणव्यवस्थेच्या दृष्टीने कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आधीच जिल्हा परिषद व नगरपालिका शाळांमधील पटसंख्या टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे. अशा वेळी शिक्षक शाळेत नसल्यास पालकांमध्ये नाराजी वाढण्याची, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर परिणाम होण्याची आणि शिक्षणाचा दर्जा घसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

Road accidents : बाळापूरमधील रस्त्यांची दुरवस्था; ७ वर्षांत ८५१ अपघात, ३३४ जणांचा मृत्यू

शिक्षकांची अवस्था सध्या ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी झाली आहे. निवडणूक विभागाच्या आदेशाचे पालन न केल्यास कारवाईची भीती, आणि शाळेत गैरहजर राहिल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान—या दुहेरी दबावात शिक्षक सापडले आहेत. त्यामुळे एसआयआरची अंमलबजावणी करताना शिक्षण व्यवस्थेचे नुकसान होणार नाही, यासाठी सरकार आणि संबंधित विभागांनी तातडीने समन्वय साधून स्पष्ट धोरण जाहीर करण्याची गरज निर्माण झाली आहे.

error: Content is protected !!