jayant-patil-meets-devendra-fadnavis-varsha-sunil-tatkare-praful-patel-political-meeting : राष्ट्रवादीचे सुनील तटकरे, प्रफुल पटेलही उपस्थित
Mumbai : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि वरिष्ठ नेते प्रफुल पटेल हे देखील ‘वर्षा’वर उपस्थित असल्याची माहिती समोर आल्याने या भेटीला अधिक महत्त्व प्राप्त झाले. मात्र, जयंत पाटील यांनी संयुक्त बैठकीच्या चर्चेला स्पष्ट शब्दांत फेटाळून लावत आपण केवळ इस्लामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष अपात्रतेच्या प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे सांगितले आहे.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, जयंत पाटील, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुमारे सव्वा तास चर्चा केल्याची माहिती समोर आली होती. तसेच मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वी या तिन्ही नेत्यांची स्वतंत्र बैठक झाल्याचाही दावा करण्यात आला. सुरुवातीला सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल ‘वर्षा’ बंगल्यावर पोहोचले, त्यानंतर जयंत पाटील तेथे दाखल झाल्याचे सांगितले जात होते. मात्र या बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
Sudhir mungantiwar : मुनगंटीवारांना दुर्गराज रायगडावरून निमंत्रण, ‘शिवसन्मान-२०२६’ने गौरवणार
दरम्यान, या चर्चांवर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी संयुक्त बैठकीचे वृत्त नाकारले. त्यांनी सांगितले की, आपली सुनील तटकरे किंवा प्रफुल पटेल यांच्यासोबत कोणतीही बैठक झाली नाही. इस्लामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षांना अपात्र ठरविण्यात आलेल्या प्रकरणासंदर्भात चर्चा करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आपण रात्री साडेदहा वाजता ‘वर्षा’वर पोहोचलो आणि सुमारे पाच मिनिटे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पावणे अकराच्या सुमारास तेथून बाहेर पडलो, असे त्यांनी स्पष्ट केले.
जयंत पाटील यांनी पुढे सांगितले की, त्या वेळी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल ‘वर्षा’वर उपस्थित असल्याची माहितीही आपल्याला नव्हती. त्यामुळे या भेटीचा त्यांच्याशी किंवा कोणत्याही राजकीय चर्चेशी संबंध जोडणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले.
Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या निवडीवर आक्षेप, पडद्यामागे कोण?
या भेटीनंतर विविध राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले असले, तरी जयंत पाटील यांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे संयुक्त बैठकीच्या चर्चांवर काही प्रमाणात पडदा पडला आहे. मात्र, एकाच वेळी विरोधी आणि सत्ताधारी गटातील महत्त्वाचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी उपस्थित असल्याने या भेटीची राजकीय चर्चा अद्यापही कायम आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही या भेटीबाबत कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे या भेटीमागील नेमके कारण आणि त्याचे राजकीय परिणाम काय असतील, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.








