व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Teachers recruitment : बुलढाणा जिल्ह्यातील ८ महाविद्यालयांना प्रवेशबंदी; शिक्षक भरती न केल्याचा...

Teachers recruitment : बुलढाणा जिल्ह्यातील ८ महाविद्यालयांना प्रवेशबंदी; शिक्षक भरती न केल्याचा फटका

Eight colleges in Buldhana district barred from admissions over failure to recruit teachers : शिक्षकांची रिक्त पदे कायम; अमरावती विद्यापीठाची ८ महाविद्यालयांवर प्रवेशबंदीची कारवाई

  • Buldhana शिक्षकांची रिक्त पदे दीर्घकाळ न भरल्याने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने बुलढाणा जिल्ह्यातील आठ महाविद्यालयांवर शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील नवीन प्रवेश प्रक्रियेवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने हा निर्णय घेतला असून संबंधित महाविद्यालयांची अधिकृत यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

प्रवेशबंदी घालण्यात आलेल्या महाविद्यालयांमध्ये ग्रंथालय व माहितीशास्त्र महाविद्यालय, श्रीरामभाऊ शेळके विधी महाविद्यालय, खामगाव, सत्यजीत सायन्स महाविद्यालय, मेहकर, स्व. गजानन गावंडे विज्ञान महाविद्यालय, खामगाव, स्व. गणेश शिंगणे कला महाविद्यालय, देऊळगाव मही, सरस्वती महाविद्यालय, शेगाव, श्रीमती तुलसीबाई झांबड वरिष्ठ महाविद्यालय, नांदुरा, तसेच श्री सरस्वती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जानेफळ आणि श्रीमती बसंतीबाई चांडक सहकार कला व वाणिज्य महाविद्यालय, डोंगरखंडाळा यांचा समावेश आहे.

Melghat Poisoning case : टिटंबा विषबाधा प्रकरणाने मेळघाट हादरला; पालकांच्या आंदोलनानंतर अधीक्षक-मुख्याध्यापक निलंबित, कंत्राटदारावर गुन्ह्याचे आदेश

विद्यापीठाच्या माहितीनुसार, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्येही शिक्षकांची आवश्यक पदे रिक्त असल्यामुळे या महाविद्यालयांवर प्रवेशबंदीची कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी संबंधित संस्थांनी लवकरच शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे प्रतिज्ञापत्र विद्यापीठाकडे सादर केले होते. मात्र, वर्षभर उलटूनही बहुतेक संस्थांनी पदभरतीची प्रक्रिया पूर्ण न केल्याने विद्यापीठाने यंदाही कठोर भूमिका घेतली.

विद्यापीठाने स्पष्ट केले आहे की, कायमस्वरूपी शिक्षकांची नियुक्ती न झाल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर आणि अध्यापनाच्या दर्जावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून नवीन प्रवेशांवर बंदी कायम ठेवण्यात आली आहे.

Neet paper leak : नीटचा पेपर महाराष्ट्रातूनच फुटला; आता एपीएसीच्या विरोधात सरकारला सरळ करू? राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा इशारा

दरम्यान, काही संस्थांनी शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू केल्याने आणि विद्यापीठाने घालून दिलेल्या अटी पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने अशा काही महाविद्यालयांना आगामी नामांकन प्रक्रियेपर्यंत तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे. मात्र, अटींची पूर्तता न झाल्यास त्यांच्यावरही पुढील कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

या निर्णयामुळे संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पर्यायी महाविद्यालयांचा पर्याय स्वीकारावा लागणार असून, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षक भरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

error: Content is protected !!