After parents’ protest over the Melghat poisoning incident, the superintendent and headmaster were suspended; orders issued to register a case against the contractor : ७० ते ८० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्यानंतर प्रशासनाची धावपळ
Amravati मेळघाटातील धारणी तालुक्यातील टिटंबा येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेत शिळे व निकृष्ट दर्जाचे अन्न दिल्याने ७० ते ८० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याच्या गंभीर प्रकरणानंतर प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. संतप्त पालक आणि आदिवासी संघटनांनी तीव्र आंदोलन छेडल्यानंतर राज्याचे आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांनी घटनास्थळी भेट देत आश्रमशाळेचे अधीक्षक संदीप गोडे आणि मुख्याध्यापक एम. पी. भागवत यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. तसेच सेंट्रल किचन चालविणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचेही निर्देश प्रशासनाला दिले.
शनिवारी रात्रीचे जेवण केल्यानंतर विद्यार्थ्यांना उलट्या, पोटदुखी आणि अस्वस्थतेचा त्रास सुरू झाला. सुमारे ७० ते ८० विद्यार्थ्यांना तातडीने धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेत उपचार मिळाल्याने बहुतांश विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
घटनेनंतर रविवारी टिटंबा आश्रमशाळेत पालक, विद्यार्थी आणि विविध आदिवासी संघटनांनी मोठ्या संख्येने एकत्र येत आंदोलन केले. सेंट्रल किचन व्यवस्था तात्काळ बंद करावी, संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करावा आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
प्रकरणाची गंभीर दखल घेत मंत्री अशोक उईके यांनी प्रथम रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली. त्यानंतर सेंट्रल किचन आणि आश्रमशाळेची पाहणी करून निष्काळजीपणाबद्दल अधीक्षक व मुख्याध्यापकांना निलंबित करण्याचे आदेश दिले. तसेच मोर रिसॉर्ट इंडिया प्रा. लि., पुणे या सेंट्रल किचनच्या कंत्राटदाराविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे लेखी निर्देशही दिले. त्यानुसार धारणीचे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यासाठी पत्र पाठविले असून सेंट्रल किचनमधून होणारा अन्नपुरवठा तातडीने बंद करण्यात आला आहे.
आंदोलनात मन्नालाल दारसिंबे, रमेश तोटे, संदीप तोटे, सुरेश पटेल, रामगोपाल मावस्कर, सरपंच दूरी सावलकर, बाबुलाल जावरकर, पटोरकर यांच्यासह अनेक पालक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.
घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी टिटंबा येथील आश्रमशाळेला भेट देऊन मुख्याध्यापकांची खरडपट्टी काढली. खराब झालेले अन्न विद्यार्थ्यांना कसे देण्यात आले, तसेच अन्न खराब असल्याची माहिती असूनही ते विद्यार्थ्यांना खाण्यास सांगितल्याचा आरोप त्यांनी उपस्थित केला. यावेळी अधीक्षक अनुपस्थित असल्याचे समजताच त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.
यानंतर त्यांनी धारणी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशारा देत दोषींवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली. या दौऱ्यात माजी आमदार राजकुमार पटेलही त्यांच्यासोबत उपस्थित होते.
दरम्यान, रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर आश्रमशाळेत परतलेल्या विद्यार्थ्यांसाठी वेळेवर भोजनाची व्यवस्था न झाल्याने आदिवासी संघटनांनी स्वतः खिचडी तयार करून विद्यार्थ्यांना भोजन दिले. या प्रकारामुळे आदिवासी विकास विभागाच्या कार्यपद्धतीवर आणि सेंट्रल किचन व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.








