Congress divided over the ‘Gungi Gudiya’ remark; Prithviraj Chavan expresses displeasure, while Harshvardhan Sapkal backs the comment : सुनेत्रा पवारांनी स्वतःला ‘दुर्गा’ सिद्ध करून दाखवावे, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे आव्हान
Mumbai राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेल्या ‘गुंगी गुडिया’ या आक्षेपार्ह उल्लेखावरून महाविकास आघाडीत आणि खुद्द काँग्रेसमध्येच मतभेद असल्याचे समोर आले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही भाषा अयोग्य असल्याचे म्हटले असतानाच, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मात्र या वक्तव्याचे समर्थन केले आहे. इतकेच नव्हे तर, सुनेत्रा पवार यांनी आपण ‘दुर्गा’ असल्याचे सिद्ध करून दाखवावे, असे उघड आव्हानही सपकाळ यांनी दिले आहे.
बीडच्या पालकमंत्री असलेल्या सुनेत्रा पवार यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीला हजेरी लावली होती. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर उत्तर देण्याऐवजी मौन बाळगले, तर आमदार धनंजय मुंडे यांनी पत्रकारांना अधिक प्रश्न विचारण्यापासून रोखले. या घटनेनंतर काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून सुनेत्रा पवार यांच्यावर ‘गुंगी गुडिया’ अशी टीका करण्यात आली.
या टीकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चांगलेच संतापले असून, महिला नेत्यांवर टीका करताना भान राखण्याचा सल्ला त्यांनी दिला. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही या भाषेवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे काँग्रेस पक्ष या प्रकरणी दिलगिरी व्यक्त करेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या टीकेचे समर्थन करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ म्हणाले की, अजित पवार यांच्या अपघाताला सहा महिने उलटूनही तपासाचा एक कागदही बाहेर आलेला नाही. अनेक शहरांमधील रस्ते खड्डेमय झाले आहेत आणि सरकारचे अनेक निर्णय चुकत आहेत. अशा स्थितीत उपमुख्यमंत्री या नात्याने सुनेत्रा पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करणे अपेक्षित असताना त्या मौन बाळगतात. हे पाहता ‘गुंगी गुडिया’ हे वर्णन योग्यच आहे, असे ते म्हणाले. त्या तशा नसतील तर त्यांनी आपण ‘दुर्गा’ आहोत हे सिद्ध करावे, असे आव्हानही त्यांनी दिले.
SIR campaign : दिव्याखाली अंधार! ‘एसआयआर’मध्ये अमरावती जिल्हा अव्वल, पण अमरावती शहर संथ
यावेळी सपकाळ यांनी सुनेत्रा पवारांना काही सल्लेही दिले. अजितदादांच्या अपघाताचा शोध लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी रोखठोक भूमिका त्यांनी सरकारमध्ये मांडावी. तसेच अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणावे आणि लाडक्या बहिणींच्या १५०० रुपयांच्या अनुदानात वाढ करून ते २१00 रुपये करावेत, असा सल्लाही सपकाळ यांनी यावेळी राष्ट्रवादीला दिला.








