व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home ताज्या बातम्या Master plan : नाराज जेनझीला पुन्हा आपल्याकडे खेचण्यासाठी फडणवीस सरकारचा ‘मास्टरप्लॅन’

Master plan : नाराज जेनझीला पुन्हा आपल्याकडे खेचण्यासाठी फडणवीस सरकारचा ‘मास्टरप्लॅन’

fadnavis-government-master-plan-for-gen-z-youth-job-fairs-and-skill-training : एक हजार रोजगार मेळावे आणि कौशल्य प्रशिक्षणावर भर!

Mumbai : राज्यातील जेन Z पिढीतील वाढती नाराजी आणि रोजगाराच्या प्रश्नावर निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने मोठा डॅमेज कंट्रोल प्लॅन आखला आहे. तरुणांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत राज्यभरात तब्बल एक हजार रोजगार मेळावे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या माध्यमातून हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येणार असून, तरुणांना रोजगाराबरोबरच कौशल्य प्रशिक्षण आणि स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शनही दिले जाणार आहे.

कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत या उपक्रमाचा आराखडा निश्चित करण्यात आला. या बैठकीला राज्यस्तरीय रोजगार मेळावा समितीचे अध्यक्ष डॉ. रणजित पाटील, सदस्य डॉ. सरोजिनी राऊत, रविंद्र देशपांडे, विशाल टिब्रेवाल, जयेश ढाके, राहुल खोले तसेच कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाचे आयुक्त डॉ. अमित सैनी उपस्थित होते.

Kapil Sibal : लोकशाहीचा कौल की पक्षांतराचे राजकारण?

सरकारच्या नव्या आराखड्यानुसार, आयटीआयपुरते रोजगार मेळावे मर्यादित न ठेवता इतर महाविद्यालयांतील विद्यार्थी, अपस्किलिंगची गरज असलेले युवक-युवती आणि विविध सामाजिक संस्थांपर्यंत हा उपक्रम पोहोचविण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका स्तरावर रोजगार मेळाव्यांची माहिती पोहोचविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तरुणांना नोकरीसोबतच स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी, यासाठी तज्ज्ञ व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून समुपदेशन कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. रोजगार मेळाव्यापूर्वी उमेदवारांना दोन आठवड्यांचे विशेष प्रशिक्षण देण्याचाही सरकारचा मानस आहे.

प्रशिक्षणाच्या पहिल्या आठवड्यात व्यक्तिमत्त्व विकास, शिष्टाचार, बायोडाटा तयार करणे आणि मुलाखतीसाठी आवश्यक संभाषण कौशल्यांवर भर दिला जाईल. दुसऱ्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या कल आणि क्षमता चाचण्यांच्या आधारे इलेक्ट्रिसिटी, प्लंबिंग, रिसेप्शनिस्ट, मार्केटिंग यांसारख्या विविध क्षेत्रांतील प्रत्यक्ष प्रात्यक्षिके दिली जाणार आहेत.
केवळ रोजगार मेळावे आयोजित करण्याऐवजी उमेदवारांना पूर्वतयारी करून रोजगारासाठी सक्षम बनविण्यावर सरकारचा भर असल्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले. योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षणामुळे रोजगार मेळाव्यांमधील निवडीचे प्रमाण वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Sudhir Mungatiwar : शब्द दिला… आणि अवघ्या २४ तासांत मुनगंटीवारांनी कृतीत उतरवला!

या महत्त्वाकांक्षी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित विभागांचे अधिकारी आणि प्रदेश समन्वय समित्यांना एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि जेन Z पिढीचा सरकारवरील विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी हा उपक्रम निर्णायक ठरू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

error: Content is protected !!