व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Uddhav Thackeray Shivsena: नागपूर उद्धव सेनेत अंतर्गत कलह शिगेला; संपर्कप्रमुखांच्या विरोधात पदाधिकारी...

Uddhav Thackeray Shivsena: नागपूर उद्धव सेनेत अंतर्गत कलह शिगेला; संपर्कप्रमुखांच्या विरोधात पदाधिकारी एकवटले, लवकरच मुंबईत धडकणार!

Internal conflicts within Nagpur Shivsena, party workers likely to meet Uddhav Thackeray in Mumbai soon : निवडणुका संपताच कुरघोडीच्या राजकारणातून उफाळला वाद

Nagpur विधानसभा निवडणुकीनंतर आधीच खिळखिळी झालेली ठाकरे सेना नागपूरमधील अंतर्गत गटबाजी आणि कुरघोडीच्या राजकारणामुळे अक्षरशः विस्कळीत होण्याच्या मार्गावर आली आहे. रामरक्षा आंदोलनानंतर नागपूरमधील उद्धव ठाकरे सेनेत प्रचंड असंतोष उफाळून आला असून, शहरातील संपूर्ण पदाधिकारी आता थेट संपर्कप्रमुखांच्या राजीनाम्याची मागणी करत आक्रमक झाले आहेत. हा वाद सोडवण्यासाठी आणि संपर्कप्रमुखांच्या मनमानी कारभाराची पोलखोल करण्यासाठी शिवसैनिकांचे शिष्टमंडळ लवकरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबई गाठणार आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर उद्धवसेनेने नागपूरच्या कार्यकारिणीत मोठे फेरबदल करत माजी उपमहापौर व नगरसेवक किशोर कुमेरिया यांच्याकडे संपूर्ण शहराची धुरा सोपवली, तर त्यापूर्वी असलेल्या दोन जिल्हाप्रमुखांऐवजी कुमेरिया यांच्या अंतर्गत तीन शहर प्रमुख विक्रम राठोड, हरिभाऊ बानाईत आणि संदीप रियाल पटेल नेमण्यात आले. महापालिका निवडणुकीपर्यंत सर्वकाही आटोक्यात असले तरी, निवडणुका संपताच जिल्हाप्रमुख सतीश हरडे आणि संपर्कप्रमुखांमध्ये वादाची ठिणगी पडली.

जिल्हाप्रमुखांच्या विरोधात संपूर्ण कार्यकारिणी असल्याचे वातावरण तयार झाले होते. याच दरम्यान रामरक्षा आंदोलनानिमित्त संजय राऊत नागपूरमध्ये दाखल झाले असता, त्यांची भेट घेऊन जिल्हाप्रमुखांच्या विरोधात तक्रार करण्याची जय्यत तयारी पदाधिकाऱ्यांनी केली होती. मात्र, ऐनवेळी संपर्कप्रमुखांनी याला तीव्र विरोध केला. ही एकमेकांच्या विरोधात तक्रारी करण्याची वेळ नाही” असे सांगत त्यांनी तक्रारदार पदाधिकाऱ्यांना गप्प बसवले.

Eknath Shinde : जरांगेंच्या टीकेनंतर शिंदेंची मोठी राजकीय चाल?

ज्यांनी तक्रारीची पार्श्वभूमी तयार करायला लावली होती, त्यांनीच ऐनवेळी पलटी मारल्याने शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. त्यामुळे संतप्त पदाधिकाऱ्यांनी आता आपला मोर्चा थेट जिल्हाप्रमुखांकडून संपर्कप्रमुखांकडे वळवला आहे. संपर्कप्रमुखांनी आपल्या वाढदिवसाला कोण आले आणि कोणी शुभेच्छा दिल्या, याची स्वतंत्र यादी तयार करून ठेवल्याची चर्चा आहे. शुभेच्छा न देणाऱ्या पदाधिकाऱ्यांना यावरून थेट पदावरून हटवण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोपही केला जात आहे.

सध्या नागपुरात विक्रम राठोड, हरिभाऊ बानाईत आणि संदीप रियाल पटेल हे तीन शहर प्रमुख स्थानिक जनतेच्या समस्यांवर आक्रमकपणे आंदोलने आणि बैठका घेत आहेत; मात्र पक्षातीलच काही बड्या नेत्यांना त्यांचे हे वाढते सक्रिय असणे खटकत असल्याचे दिसते. कार्यकर्त्यांना शहर प्रमुखांच्या आंदोलनांमध्ये सहभागी न होण्याच्या सूचना दिल्या जात असल्याची चर्चा असून, यामुळे पक्षात दोन स्पष्ट गट पडल्याचे चित्र आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर आधीच संघटनात्मक बाजू अतिशय कमकुवत झाली आहे. महापालिका निवडणुकीत उद्धव सेनेचे अवघे दोनच नगरसेवक निवडून आले, ज्यात जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया यांचाही समावेश आहे. महापालिका निवडणुकीदरम्यान कुमेरिया यांनी ओबीसी प्रवर्गातून लढण्याऐवजी खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने पक्षात मोठा वाद पेटला होता. तत्कालीन शहर प्रमुख नितीन तिवारी यांनी याविरोधात बंडखोरी करून कुमेरिया यांना आव्हान दिले होते.

Teacher Recruitment : राज्यात शिक्षक भरतीचा बिगुल; ३०,२०९ पदांची मेगा भरती

परिणामी, पक्षाने नितीन तिवारी यांना निलंबित केले आणि ते आता शिंदे सेनेत दाखल झाले आहेत. पक्षाची आधीच दयनीय अवस्था असताना आणि संघटन कमकुवत झाले असताना, नेत्यांमधील अशी आपापसातील सुंदोपसुंदी आणि कुरघोडीचे राजकारण पक्षाला आणखी रसातळाला नेणारे ठरत आहे. आता नागपूरमधील या बंडखोरीवर आणि असंतोषावर उद्धव ठाकरे काय कठोर निर्णय घेणार? आणि कोणाचा बळी जाणार? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!