व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Vijay wadettiwar : गोसेखुर्द उजव्या कालव्याचा बोजवारा: वर्षभरातच २३५ कोटींच्या कामाला भेगा;...

Vijay wadettiwar : गोसेखुर्द उजव्या कालव्याचा बोजवारा: वर्षभरातच २३५ कोटींच्या कामाला भेगा; वडेट्टीवारांचा कंत्राटदारांवर संताप

Cracks appear within a year in the ₹235-crore Gosikhurd Right Bank Canal project : निकृष्ट कामामुळे कोट्यवधी रुपयांचा सार्वजनिक निधी पाण्यात गेल्याचा आरोप

Nagpur ब्रम्हपुरी तालुक्यातील तोरगाव परिसरातून जाणाऱ्या गोसेखुर्द उजव्या कालव्याच्या अत्यंत निकृष्ट कामामुळे कोट्यवधी रुपयांचा सार्वजनिक निधी कसा पाण्यात गेला आहे, याची पोलखोल झाली असून अवघ्या वर्षभरातच या कालव्याला अनेक ठिकाणी मोठ्या भेगा पडल्या आहेत व काही ठिकाणचे बांधकामही खचले आहे.

गोसेखुर्द उजव्या कालव्यावरील ‘क्रिटिकल पॅचेस’च्या बांधकामासाठी दोन वर्षांपूर्वी एम.के.एस., बी.आय.पी.एल. आणि सरला या कंपन्यांना तब्बल २३५ कोटी रुपयांचे घसघशीत कंत्राट देण्यात आले होते. मात्र, काम पूर्ण करण्याची ठरलेली मुदत संपूनही या कंपन्यांकडून प्रत्यक्षात अवघे १५ टक्केच काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यातही जे थोडेफार काम झाले, त्याचा दर्जा अत्यंत सुमार आणि निकृष्ट असल्याचे स्पष्ट झाल्याने या संपूर्ण प्रकरणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कामाच्या या संथ गतीमुळे आणि ऐन हंगामात सिंचनाचे पाणी वेळेवर न मिळाल्यामुळे यापूर्वीच संतप्त शेतकऱ्यांनी कार्यकारी संचालकांच्या कार्यालयावर धडक देत तीव्र आंदोलन केले होते. असे असतानाही प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांचा रोष अधिकच तीव्र झाला होता. अखेर याप्रकरणी विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी थेट घटनास्थळी धाव घेत कालव्याची पाहणी केली.

Maratha-OBC certificate : मराठा-ओबीसी प्रमाणपत्रावरून रणकंदन; जरांगेंच्या आरोपांना बावनकुळे यांचे चोख प्रत्युत्तर, दिली आकडेवारी!

पाहणीदरम्यान कामाचा निकृष्ट दर्जा उघडकीस आल्यानंतर त्यांनी संबंधित कंत्राटदार आणि सिंचन विभागातील कार्यकारी अभियंता सुहास मोरे यांच्यासह उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळेच हे काम निकृष्ट दर्जाचे होत असून शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्याशी आणि जनतेच्या पैशाशी खेळ केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दांत सुनावले. जनतेच्या पैशाची अशी उधळपट्टी करणाऱ्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही, असा कडक इशारा देत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी, अभियंते आणि संबंधित कंत्राटदारांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.

तसेच, अत्यंत निकृष्ट काम करणाऱ्या एम.के.एस. कंपनीला तातडीने काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी आक्रमक मागणीही त्यांनी केली. कालवा पाहणीदरम्यान अधिकाऱ्यांकडून कामाचा सविस्तर आढावा घेत, तातडीने दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर पूर्ण करून शेतकऱ्यांना अखंडित पाणीपुरवठा करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. गोसेखुर्दसारख्या महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्पात निकृष्ट काम,कामातील विलंब आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे हजारो शेतकरी अडचणीत आले असल्याचा आरोपही यावेळी वडेट्टीवार यांनी केला.

error: Content is protected !!