Proposal for 50 MBBS seats pending for the past six months : मंजुरीच्या प्रतीक्षेत ‘जीएमसी’; यंदा जागावाढ होणार का, संभ्रम कायम
Akola शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (जीएमसी) एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या ५० जागा वाढविण्याचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित आहे. सध्या महाविद्यालयात एमबीबीएसच्या २०० जागांवर प्रवेश दिला जातो. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास प्रवेश क्षमता २५० पर्यंत वाढणार आहे. मात्र, अद्याप शासनाची अंतिम मंजुरी न मिळाल्याने यंदा या अतिरिक्त ५० जागांवर प्रवेश मिळणार की नाही, याबाबत संभ्रम कायम आहे.
राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने एमबीबीएसच्या जागा वाढविण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांकडून प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार जीएमसी प्रशासनाने आवश्यक बाबींची पूर्तता करून ५० जागा वाढविण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला. प्रस्ताव सादर होऊन सुमारे सहा महिने झाले आहेत. मात्र, प्रशासकीय तसेच तांत्रिक मंजुरीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.
एमबीबीएसच्या जागांमध्ये वाढ झाल्यास अधिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. मात्र, त्याचवेळी वाढीव प्रवेश क्षमतेनुसार प्राध्यापकांची पदे, आवश्यक मनुष्यबळ आणि इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणेही महत्त्वाचे ठरणार आहे.
Akola MIDC : उद्योग नाही, भूखंड मात्र ताब्यात; २६० धारकांना एमआयडीसीची नोटीस
जागा वाढल्यास क्षमता २५०
जीएमसीमध्ये सध्या दरवर्षी एमबीबीएसच्या २०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. शासनाने ५० जागांच्या वाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास ही संख्या २५० होईल. त्यामुळे प्रस्तावाला मंजुरी कधी मिळते आणि यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत वाढीव जागांचा समावेश होतो का, याकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले आहे.
सहा महिन्यांपूर्वीच प्रस्ताव सादर
“एमबीबीएसच्या ५० जागा वाढविण्याचा प्रस्ताव शासनाकडे सहा महिन्यांपूर्वीच सादर करण्यात आला आहे. प्रस्तावावर शासनस्तरावर अद्याप निर्णय झालेला नाही. मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रवेश प्रक्रियेबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल,” अशी माहिती जीएमसीचे अधिष्ठाता डॉ. संजय सोनुने यांनी दिली.








