On Pawar’s NCP MPs’ meeting with PM Modi, Fadnavis said, “Even the Opposition meets me; I would be happy if anyone joins the NDA : नरेंद्र मोदी हे कुण्या एका पक्षाचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे पंतप्रधान असल्याचे केले स्पष्ट
Nagpur पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ८ खासदारांच्या नुकत्याच झालेल्या भेटीने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगवली असून या भेटीमागील राजकीय अजेंड्यावरून विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत. यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्ष फुटण्याच्या भीतीने हे नेते मोदींना भेटत असल्याचा दावा केला होता, तर यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांचे खासदार एनडीएमध्ये सहभागी होणार असतील तर आम्हाला आनंदच होईल, असे सूचक आणि मोठे विधान केले आहे.
नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुण्या एका पक्षाचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे अनेक नेते आपापल्या मतदारसंघातील कामे आणि समस्या घेऊन त्यांना भेटत असतात आणि चर्चा करतात. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असल्याने मलादेखील विरोधी पक्षांचे नेते व कार्यकर्ते भेटत असतात आणि आपली कामे सांगत असतात. त्यामुळे या भेटीकडे कुठल्याही वेगळ्या दृष्टीने पाहण्याचे कारण नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या भेटीमागे काहीतरी गंभीर संकेत दडल्याचे म्हटले होते. शरद पवार व त्यांच्या पक्षातील नेते आतापर्यंत चार वेळा मोदींना भेटले असून, भाजपमार्फत पक्ष फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याने ती फूट थोपवण्यासाठीच हे नेते मोदींची भेट घेत असावेत, असा दावा चव्हाणांनी केला.
दरम्यान, नागपूरमधील कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतरही मुद्द्यांवर रोखठोक भूमिका मांडली. देशभरात आणि महाराष्ट्रात काढल्या जाणाऱ्या ‘तिरंगा रॅली’चा उल्लेख करून ते म्हणाले की, मी नागपूरसह मुंबई, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील रॅलींमध्ये सहभागी होणार आहे. तसेच, केंद्र सरकारच्या नव्या ‘एफसीआरए’ (FCRA) विधेयकावर भाष्य करताना त्यांनी, यामुळे अमेरिकेतील काही लोकांची मिरची झोंबली असली तरी हे विधेयक कोणत्याही एका समुदायाच्या विरोधात नाही. परदेशातून देणगी घ्यायची असल्यास नव्या विधेयकानुसार परवानगी घ्यावी लागेल, इतकाच याचा उद्देश असल्याचे स्पष्ट केले.








