व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Mahayuti Politics : महायुतीतच धुसफूस; महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंवर थेट निशाणा

Mahayuti Politics : महायुतीतच धुसफूस; महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंवर थेट निशाणा

mahendra-dalvi-sunil-tatkare-raigad-mahayuti-ncp-shiv-sena-politics : मतभेद चव्हाट्यावर तटकरे कुटुंबाला मोठा झटका देण्याचा इशारा

Mumbai : राज्यात महायुतीच्या माध्यमातून शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे सत्तेत असले, तरी रायगड जिल्ह्यातील राजकीय संघर्ष मात्र कायम असल्याचे चित्र आहे. शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका करत जिल्ह्यातील महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आणले आहेत.

पत्रकारांशी संवाद साधताना महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट निशाणा साधला. “राष्ट्रवादी नेहमी खोडा घालणारा पक्ष आहे. राष्ट्रवादीला आम्ही गणतीत पकडत नाही,” अशा शब्दांत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. भाजप आणि शिवसेनेचे विचार अनेक मुद्द्यांवर जुळत असल्याचे सांगत त्यांनी रायगडमध्ये महायुतीतील तिन्ही पक्षांनी एकत्रित काम करण्याच्या मुद्द्यावरही आपली भूमिका स्पष्ट केली.

रायगड लोकसभा मतदारसंघाबाबतही महेंद्र दळवी यांनी आक्रमक भूमिका घेतली. आगामी काळात रायगड लोकसभेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार असल्याचा दावा त्यांनी केला. या लढाईसाठी एक नव्हे, तर चार जण तयार असून ही लढाई आपण नक्की जिंकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याचवेळी तटकरे कुटुंबाला आगामी काळात मोठा राजकीय झटका बसणार असल्याचा इशारा देत त्यांनी रायगडच्या राजकारणातील संघर्ष आणखी तीव्र होण्याचे संकेत दिले.

Pruthviraj chavan: २०१४ मध्येच शिवसेनेकडून महाविकास आघाडीच्या स्थापनेचा प्रस्ताव; पण मीच फेटाळून लावला

रायगडच्या पालकमंत्रीपदी शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांची निवड झाल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष केला होता. मात्र, गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळण्यासाठी आपलाही पुढाकार असल्याचे सुनील तटकरे यांनी अलिबाग येथील पत्रकार परिषदेत म्हटले होते. याच वक्तव्यावर महेंद्र दळवी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

“पालकमंत्रीपदाचे श्रेय सुनील तटकरेंनी घेऊ नये. त्यांनी आता स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. उगीच या निर्णयाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये,” असे म्हणत दळवींनी तटकरेंना सुनावले. भरत गोगावले हे सर्वसामान्य जनतेतून पुढे आलेले कार्यकर्ते आणि नेते असल्याचे सांगत दळवींनी पालकमंत्रीपद हा शिवसेनेचा अधिकार असल्याचा दावा केला. रायगडमध्ये शिवसेनेकडे सर्वाधिक जनाधार असल्यामुळे गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळणे स्वाभाविक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भरत गोगावले यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर सुनील तटकरे यांनी अद्याप त्यांना शुभेच्छा दिलेल्या नसल्याबाबत महेंद्र दळवींना विचारण्यात आले. त्यावर त्यांनी तटकरेंवर आणखी एकदा निशाणा साधला. “आम्हाला त्यांच्या शुभेच्छांची अपेक्षासुद्धा नाही. सुनील तटकरे हे दुसऱ्यांच्या कार्यक्रमात खोडा घालणारे व्यक्तिमत्त्व आहेत,” अशी बोचरी टीका दळवींनी केली.

त्यांच्या या वक्तव्यामुळे रायगडमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे. राज्यस्तरावर महायुतीतील घटक पक्ष एकत्र असले, तरी स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे किती गुंतागुंतीची आहेत, याची झलक या वादातून पाहायला मिळत आहे.

दरम्यान, महेंद्र दळवींनी आपल्या राजकीय भवितव्याबाबतही महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. पक्षाच्या कठीण काळात साथ देणाऱ्या पहिल्या फळीतील आमदारांमध्ये आपला समावेश असल्याचे सांगत त्यांनी मंत्रिपदाची इच्छा उघडपणे व्यक्त केली.

“आम्ही पक्षाच्या पडत्या काळातील आमदार आहोत. पक्षाला कठीण काळात साथ देणाऱ्या पहिल्या फळीतील आमदारांमध्ये माझा समावेश आहे. पक्षाने भरत गोगावले यांच्या रूपाने आम्हाला एक मंत्री दिलेला आहे. मात्र, माझ्या कार्यकर्त्यांचीही मला मंत्रिपद मिळावे, अशी अपेक्षा आहे. मीसुद्धा याबाबत आशावादी आहे. येणाऱ्या काळात पक्ष माझ्यासाठी नक्कीच विचार करेल,” असे महेंद्र दळवी यांनी सांगितले. मात्र, मंत्रिपदाबाबतचा अंतिम निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या हातात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर दळवींच्या या वक्तव्याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

Rahul Gandhi : विद्यार्थ्यावरील लाठीमार अन् पॅलेट गन प्रकरणी राहुल गांधी आक्रमक; पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडत एफआयआरची मागणी

महायुतीतील अंतर्गत मतभेद अधूनमधून समोर येत असताना रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष सातत्याने चर्चेचा विषय ठरत आहे. पालकमंत्रीपदाचे श्रेय, स्थानिक राजकीय वर्चस्व आणि आगामी लोकसभा निवडणुकीची संभाव्य तयारी या पार्श्वभूमीवर महेंद्र दळवींच्या आक्रमक वक्तव्यामुळे रायगडच्या राजकारणात नव्या संघर्षाची ठिणगी पडली आहे.

विशेषतः रायगड लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार आणि तटकरे कुटुंबाला आगामी काळात झटका देण्याचा इशारा यामुळे जिल्ह्यातील महायुतीच्या राजकीय समीकरणांकडे आता अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे. आगामी काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील हा संघर्ष कोणत्या वळणावर जातो, तसेच महायुतीतील वरिष्ठ नेतृत्व स्थानिक पातळीवरील मतभेद कसे सोडवते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!