High voltage political drama ahead of Rahul Gandhi pune visit: युवक काँग्रेस आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत तुफान राडा
Pune काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय वातावरण भडकले असून शहरात दाखल होण्यापूर्वीच काँग्रेसची युवक आघाडी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात तुफान राडा झाला आहे.
एका विद्यार्थिनीने राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली असता, एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी तिच्या वसतिगृहात जाऊन तिला एका खोलीत कोंडून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्या विद्यार्थिनीला शिवीगाळ करत मारहाण व धमकावण्यात आल्यानंतर तिने तातडीने युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना घडलेला प्रकार सांगितला. घटनेची माहिती मिळताच युवक काँग्रेसचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही गटांत जोरदार हाणामारी झाली.
या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देशात लोकशाही आहे की हुकूमशाही असा सवाल करत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजप राहुल गांधींच्या कार्यक्रमाला घाबरली असून कार्यक्रम उधळून लावण्यासाठी वसतिगृहात जाऊन निष्पाप विद्यार्थिनींना धमकावले जात आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी केला.
Mahayuti Politics : महायुतीतच धुसफूस; महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंवर थेट निशाणा
तर दुसरीकडे, भाजपने हे सर्व आरोप फेटाळून लावत राड्याचे खापर काँग्रेसवरच फोडले आहे. काँग्रेस पैसे देऊन विद्यार्थ्यांना गोळा करत असून या कार्यक्रमासाठी तब्बल ९ ते १० कोटी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे; ही ‘छात्रों की गूंज’ नसून पैशांची गूंज’ आहे, असा खोचक टोला भाजपने लगावला आहे. राहुल गांधींच्या आगमनाआधी घडलेल्या या घटनेमुळे शहरातील वातावरण कमालीचे तापले असून कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.








