व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Manoj Jarange : ‘आळस झटकून बाहेर पडा, लेकरांसाठी पेटून उठा’; मनोज जरांगे...

Manoj Jarange : ‘आळस झटकून बाहेर पडा, लेकरांसाठी पेटून उठा’; मनोज जरांगे आक्रमक

manoj-jarange-patil-29-august-maratha-agitation-antarwali-sarati-maratha-reservation-warning-government : २९ ऑगस्टच्या आंदोलनाआधी, सरकारलाही थेट इशारा

Jalna : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा कालावधी संपत असताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरू करण्याची घोषणा करत त्यांनी मराठा समाजाला घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आंदोलन मुंबईकडे वळवले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

अंतरवाली सराटी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. मराठा समाजात उदासीनता असल्याचा दावा सरकारकडून केला जात असल्याचा आरोप करत त्यांनी समाजाला आळस आणि मरगळ झटकून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.

“घरात बसून राहू नका. आपल्या लेकरा-बाळांसाठी बाहेर पडा. मुलांचे नुकसान करू नका,” असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. ज्या मराठ्यांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले आहेत, मात्र त्यांचे अर्ज स्वीकारले गेले नाहीत किंवा नोंद सापडूनही प्रमाणपत्र मिळालेले नाही, अशांनी अंतरवाली सराटीत यावे, असेही त्यांनी सांगितले.

सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहावे, असे सांगताना जरांगे पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले. जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांपेक्षा तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि जात पडताळणी अधिकाऱ्यांच्या पातळीवर प्रश्न सोडवण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.

मराठा समाजाच्या प्रश्नावर सरकारमधील नेत्यांनी योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा त्याचे राजकीय परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला. विखे पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई आणि लाड यांच्यासह सरकारमधील संबंधित मंत्र्यांनी सावध राहून मराठा समाजाला योग्य शासन निर्णय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

Farmers P : एमआयडीसीत ५० टक्के जागा रिकामी, सावनेरची सुपीक जमीन पुन्हा कशासाठी?

दरम्यान, मराठा समाजाच्या कुणबी नोंदींच्या संख्येवरूनही जरांगे पाटील यांनी सरकारवर आरोप केले. राज्यात ५८ लाख नोंदी सापडल्याचा दावा करत, या नोंदींची संख्या कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. याआधी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नोंदींच्या संख्येबाबत केलेल्या वक्तव्यावरूनही त्यांनी सरकारला लक्ष्य केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आपण दीर्घकाळ संवाद साधला; मात्र सरकारकडून मराठा समाजाच्या प्रश्नावर अपेक्षित निर्णय होत नसल्याची नाराजी जरांगे पाटील यांनी व्यक्त केली. सरकारने काही निर्णय दिले असले तरी त्याचवेळी समाजाचे नुकसानही होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

२९ ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आंदोलन अंतरवाली सराटीतूनच सुरू होईल. मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर पुढील टप्प्यात मुंबईकडे कूच करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. पाच टप्प्यांत मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईत दाखल होईल, असा दावाही त्यांनी केला.

Kailas Patil : ‘पळवा-पळवी’ला कायदेशीर दणका? मशालीवर निवडून आलेल्या सदस्यांवर कारवाई !

त्यामुळे २९ ऑगस्टला अंतरवाली सराटीत होणाऱ्या आंदोलनाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. सरकार या आंदोलनापूर्वी मराठा समाजाच्या मागण्यांवर कोणता निर्णय घेते आणि जरांगे पाटील त्यावर कोणती भूमिका घेतात, यावर पुढील आंदोलनाची दिशा ठरण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!