व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Chitra Wagh : रुग्ण उपचाराविना जमिनीवर, रुग्णवाहिकाच गायब!

Chitra Wagh : रुग्ण उपचाराविना जमिनीवर, रुग्णवाहिकाच गायब!

amravati-district-hospital-patient-on-floor-no-ambulance-chitra-wagh-angry : ‘अग्नितांडवा’नंतरही अमरावती जिल्हा रुग्णालयाचा अनागोंदी कारभार; चित्रा वाघ संतापल्या

Amaravati : दोन दिवसांपूर्वीच तीन निष्पाप बालकांचा बळी घेणाऱ्या अमरावती जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक आणि बेजबाबदार कारभार अद्यापही सुधारलेला नसल्याचे समोर आले आहे. अतिदक्षता विभागातील भीषण अग्नितांडवातून ६६ बालकांचे प्राण वाचले असले, तरी रुग्णालयातील ढिसाळ आणि निष्काळजी कारभार कायम असल्याचे आजच्या घटनेने पुन्हा स्पष्ट केले.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज अमरावती जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने एक असहाय्य रुग्ण रुग्णालयाच्या आवारात जमिनीवर बसून उपचाराच्या प्रतीक्षेत असल्याचे विदारक दृश्य त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकारामुळे चित्रा वाघ संतप्त झाल्या. त्यांनी उपस्थितांसमोरच जिल्हा शल्यचिकित्सकांना चांगलेच धारेवर धरत रुग्णालय प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

अमरावती जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या दुर्घटनेत तीन बालकांचा मृत्यू झाला, तर ६६ बालकांचे प्राण वाचवण्यात यश आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृत बालकांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर करत घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले होते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राजस्थानचा दौरा अर्धवट सोडून अमरावती गाठत परिस्थितीची पाहणी केली होती. या दुर्घटनेवरून विरोधकांनीही सरकारवर जोरदार टीका केली होती.

Adivasi Student Movement : राहुल गांधींच्या पत्रानंतर सरकार जागे; आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्याचा अशोक उईके यांचा दावा

एवढी गंभीर दुर्घटना घडल्यानंतर रुग्णालय प्रशासन अधिक सतर्क होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, रुग्णवाहिकेअभावी रुग्णाला जमिनीवर बसून राहण्याची वेळ आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “अग्नितांडवानंतरही रुग्णालय प्रशासनाला जाग आली नाही,” अशा शब्दांत या प्रकारावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.

रुग्णालयाच्या पाहणीसाठी आलेल्या चित्रा वाघ यांच्या नजरेस आवारात जमिनीवर बसलेला एक असहाय्य रुग्ण पडला. त्यांनी त्या रुग्णाची विचारपूस केली असता, “रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे येथेच जमिनीवर बसून राहावे लागत आहे,” अशी व्यथा त्याने मांडल्याचे सांगण्यात आले.

Manoj Jarange : ‘मुंबईत ४५ लाख गाड्या येणार!’; मनोज जरांगेंनी थेट आकडाच सांगितला

 

हा प्रकार समोर येताच चित्रा वाघ यांचा संताप अनावर झाला. त्यांनी तातडीने जिल्हा शल्यचिकित्सकांना बोलावून घेतले आणि रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल जाब विचारला. एवढी मोठी दुर्घटना घडल्यानंतरही प्रशासनाला अद्याप जाग का आली नाही, असा सवाल करत त्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले.

बालकांच्या मृत्यूच्या दुर्घटनेनंतर अवघ्या दोन दिवसांत रुग्णवाहिकेअभावी रुग्णाला जमिनीवर बसून उपचाराची प्रतीक्षा करावी लागल्याने अमरावती जिल्हा रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. चित्रा वाघ यांच्या आक्रमक भूमिकेमुळे रुग्णालय प्रशासनातही एकच खळबळ उडाली असून, जिल्हा रुग्णालयाचा कारभार पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
___

error: Content is protected !!