nepal-flood-106-maharashtra-pilgrims-return-journey-devendra-fadnavis-help-nagpur : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने तातडीने मदत; पटना येथून नागपूरच्या दिशेने रेल्वेने रवाना
Nagpur : पर्यटन आणि धार्मिक कार्यक्रमासाठी नेपाळमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील भाविकांवर निसर्गाच्या संकटाचे सावट आले आहे. नेपाळमधील भीषण पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील अनेक नागरिक विविध ठिकाणी अडकून पडले होते. या संकटाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने सूत्रे हलवत केलेल्या प्रभावी समन्वयामुळे नेपाळमध्ये अडकलेल्या १०६ भाविकांचा महाराष्ट्राकडे सुरक्षित परतीचा प्रवास सुरू झाला आहे.
महाराष्ट्रातून पर्यटन आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी सुमारे ४०२ नागरिक नेपाळ आणि लगतच्या परिसरात गेले होते. मात्र, पुराचा मोठा तडाखा बसल्याने अनेक ठिकाणी दळणवळणाची साधने ठप्प झाली आणि हे नागरिक विविध ठिकाणी अडकले. यापैकी सुमारे २० नागरिक अद्याप संपर्काबाहेर असल्याची माहिती आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी तसेच संपर्क तुटलेल्या नागरिकांशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि केंद्र सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेपाळमधील स्थानिक प्रशासन तसेच बिहार सरकारशी तातडीने संपर्क साधला. काठमांडू येथून महाराष्ट्रातील भाविकांना सुरक्षितपणे भारतीय सीमेपर्यंत आणण्यासाठी विशेष बसची व्यवस्था करण्यात आली. नेपाळपासून बिहारपर्यंतच्या प्रवासादरम्यान भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रशासकीय पातळीवर आवश्यक समन्वय आणि मदतीची यंत्रणा उभारण्यात आली.
Devendra Fadnavis : महायुतीला धक्का देणाऱ्या गोकुळ गितेंच्या घरी फडणवीसांची अचानक एन्ट्री
भाविकांना महाराष्ट्रात सुखरूप पोहोचवण्यासाठी रेल्वे प्रवासाचेही विशेष नियोजन करण्यात आले. त्यानुसार, आज सकाळी ७ वाजून ३६ मिनिटांनी रेल्वे क्रमांक १७६०९ (पटना–पूर्णा एक्स्प्रेस) ने १०६ भाविक पटना येथून नागपूरच्या दिशेने रवाना झाले. सर्व भाविक सुखरूप असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
दरम्यान, उर्वरित नागरिक तसेच संपर्काबाहेर असलेल्या भाविकांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे महाराष्ट्रात परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. प्रशासनातील विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधून प्रत्येक नागरिकापर्यंत मदत पोहोचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
नेपाळमधील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने तातडीने केलेल्या हालचाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे अडकलेल्या भाविकांच्या सुटकेला वेग आला असून, उर्वरित नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठीही प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
___







