devendra-fadnavis-on-manoj-jarange-eknath-shinde-maratha-reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय हालचालींना वेग
Nagpur : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी महायुती सरकारविरोधात पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत १२ ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. यावेळी जरांगे यांचा मुख्य रोख शिवसेनेकडे (शिंदे गट) वळला असून त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात केलेली प्रतिक्रिया राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरत आहे. जरांगे यांच्या मागण्यांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आधीपासूनच काम करत आहेत, असे सांगत फडणवीस यांनी या विषयाचा चेंडू एकप्रकारे थेट शिंदेंच्या कोर्टात टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी मराठा समाजातील उमेदवारांची कुणबी प्रमाणपत्रे जात पडताळणी समितीकडून फेटाळली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. सुरुवातीला त्यांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला होता. मात्र, आता त्यांनी आपला रोख शिवसेनेकडे (शिंदे गट) वळवला आहे. “आम्ही शिंदेसेनेच्या आमदार-खासदारांना निवडून आणले आणि आता आमचीच प्रमाणपत्रे रद्द केली जात आहेत,” असा घणाघात करत जरांगे यांनी आगामी निवडणुकीत शिंदेसेनेच्या उमेदवारांना पाडण्याचा इशाराही दिला होता. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुतीतील अंतर्गत राजकीय समीकरणांवरही चर्चा सुरू झाली आहे.
या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी जरांगे यांच्या मागण्यांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आधीपासूनच काम करत असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे जरांगे यांच्या आंदोलनाचा आणि त्यांच्या मागण्यांचा मोर्चा थेट शिवसेना (शिंदे गट) आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे वळविण्याची भूमिका फडणवीस यांच्या विधानातून दिसत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांनी शिंदेसेनेच्या परभणीतील शेतकरी मेळाव्याला विरोध करत तो उधळून लावण्याचा इशारा दिला होता. मेळाव्यादरम्यान जरांगे समर्थकांनी घोषणाबाजी करत विरोधही दर्शवला. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिस्थिती अत्यंत कौशल्याने हाताळली. “ते आपलेच लोक आहेत,” असे म्हणत शिंदे यांनी आंदोलकांना मंचासमोर सन्मानाने बसवून घेतले.
जरांगे यांचा विरोध आणि इशारा असतानाही परभणीतील शेतकरी मेळावा पार पडला. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानानंतर आणि परभणीतील घडामोडींनंतर मनोज जरांगे-पाटील शिंदे सरकारविरोधात पुढील कोणती भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
___








