sadabhau-khot-ministerial-berth-mahayuti-devendra-fadnavis-sugar-ethanol : सदाभाऊ खोतांची खदखद, आधी सत्तेवर निशाणा मग फडणवीसांचं कौतुक!
Mumbai : महायुती सरकारमध्ये बाहेरून आलेल्या नेत्यांना मंत्रिपद मिळत असताना आपण मात्र फक्त बघत बसलो, अशी बोचरी खदखद विधान परिषदेचे आमदार आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली आहे. रयत क्रांती संघटनेच्या ऊस आणि इथेनॉल परिषदेत बोलताना खोत यांनी सत्तेतील मंत्रिपदाच्या वाटपापासून प्रस्थापित राजकीय नेत्यांच्या कथित कारभारापर्यंत अनेक मुद्द्यांवर जोरदार भाष्य केले. विशेष म्हणजे, सुरुवातीला सत्तेतील राजकीय समीकरणांवर नाराजी व्यक्त केल्यानंतर अखेरीस त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत आपली भूमिका काहीशी सावरून घेतल्याचे पाहायला मिळाले.
सदाभाऊ खोत यांनी मंत्रिपदाच्या मुद्द्यावरून थेट महायुतीतील राजकीय समीकरणांवर बोट ठेवले. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा नेता तळागाळातून वर येतो आणि दीडशे आमदारांचा नेता होतो. आम्हीही तुमचेच आहोत, असे म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. ‘वाड्यातले सरदार फडणवीसांच्या पायाला जाऊन मिठी मारतात. पडळकर साहेब, हे सरदार आले आणि साहेबांच्या पायाला लागले. ते मंत्री झाले आणि आपण फक्त बघत बसलो. आपल्यावर काय वाईट वेळ आलीय,’ अशा शब्दांत खोत यांनी मंत्रिपद न मिळाल्याची खदखद जाहीरपणे बोलून दाखवली.
या वक्तव्यामुळे महायुतीतील सत्तावाटपावरून असलेली त्यांची नाराजी स्पष्टपणे समोर आली. विशेष म्हणजे, नव्याने महायुतीत दाखल झालेल्या नेत्यांना मंत्रिपद मिळत असताना जुन्या सहकाऱ्यांना अपेक्षित राजकीय स्थान मिळत नसल्याची भावना त्यांच्या वक्तव्यातून व्यक्त झाली. खोत यांच्या वक्तव्याचा रोख केवळ मंत्रिपदापुरता मर्यादित राहिला नाही. सत्तेच्या राजकारणात प्रस्थापित नेते आणि नव्याने सत्तेच्या जवळ आलेल्यांना मिळणारे महत्त्व यावरही त्यांनी टोला लगावला.
यावेळी त्यांनी काही प्रस्थापित राजकीय नेत्यांच्या कथित आर्थिक कारभारावरही गंभीर आरोप केले. बँका, सूतगिरण्या आणि साखर कारखाने यांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. ‘मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो. हे गडी आत घ्या, यांना तेल लावून चांगलं मालिश करा. त्यांनी बँका, सूतगिरण्या, साखर कारखाने कसे खाल्ले याचा रिपोर्ट करा. या सर्व प्रस्थापितांनी गावगाडा उध्वस्त केला,’ असे खोत म्हणाले.
Umesh Patil Vs Mahebub Shaikh : ‘संस्थापकत्व हा इतिहास, मालकीहक्क नाही’ राष्ट्रवादीत जुना वाद पेटला!
बँकेच्या संचालकपदावरूनही सदाभाऊ खोत यांनी राजकीय नेत्यांना उपरोधिक टोला लगावला. ‘आमदाराला बँकेत संचालक व्हावं वाटतं, कारण त्यांना माहिती आहे की बँक ही अलीबाबाची गुहा आहे. त्या गुहेत गेलं की पोतं घेऊनच बाहेर पडायचं, हे त्यांना माहिती आहे,’ असे ते म्हणाले. खोत यांच्या या विधानामुळे सहकारी बँका आणि साखर कारखान्यांच्या राजकारणावरूनही त्यांनी आपली नाराजी स्पष्टपणे मांडल्याचे दिसून आले.
ऊस आणि इथेनॉल परिषद असल्याने खोत यांनी इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या मुद्द्यावरही भूमिका मांडली. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे वाहनांना नुकसान होते, या विरोधकांच्या दाव्याला त्यांनी प्रत्युत्तर दिले. ‘इथेनॉलमुळे गाड्या बंद पडल्या असत्या, तर मुंबईत निम्म्या गाड्या बंद पडल्या असत्या,’ असा दावा त्यांनी केला. परदेशात पेट्रोलमध्ये ३० टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिश्रण केले जाते, तर भारतात २० टक्क्यांपर्यंत मिश्रण केले जाते, असेही त्यांनी सांगितले. इथेनॉलच्या वापरामुळे देशाचे कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन वाचू शकते आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठीही त्याचे महत्त्व असल्याचे खोत यांनी स्पष्ट केले.
मात्र, सत्तेतील राजकीय समीकरणांवर नाराजी व्यक्त केल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. फडणवीस यांच्या राजकीय प्रवासाचा दाखला देत त्यांनी तळागाळातून आलेला नेता राज्याच्या सर्वोच्च पदावर पोहोचल्याचे सांगितले. ‘आपला विस्थापित व्यक्ती राज्याचा मुख्यमंत्री झाला आणि प्रस्थापित त्याच्यासमोर लोटांगण घालू लागले, हा खरा आमचा विजय आहे,’ असे खोत यांनी म्हटले.
त्यामुळे एकीकडे मंत्रिपद न मिळाल्याची खदखद, सत्तेतील राजकीय समीकरणांवरचे टोले आणि प्रस्थापित नेत्यांवरील टीका असा आक्रमक सूर लावल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी अखेरीस फडणवीसांच्या नेतृत्वाचे कौतुक करत आपली भूमिका सावरल्याचे त्यांच्या भाषणातून दिसून आले. त्यांच्या या वक्तव्याची सध्या महायुतीच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.








