maharashtra-delhi-sir-draft-voter-list-2026-2-crore-47-lakh-names-missing-check-voter-name-form-6 : तुमचं नाव आहे का? लगेच असं करा चेक
Mumbai : महाराष्ट्र आणि दिल्लीतील मतदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. विशेष सघन पुनरीक्षण अर्थात एसआयआरअंतर्गत प्रारुप मतदार यादी जाहीर करण्यात आली असून या यादीतून महाराष्ट्रातील सुमारे 2 कोटी 7 लाख, तर दिल्लीतील 47 लाख 56 हजार 722 मतदारांची नावे समोर आलेली नाहीत. त्यामुळे तुमचं नाव या प्रारुप यादीत आहे की नाही, हे तातडीने तपासणे महत्त्वाचे आहे. मात्र, प्रारुप यादीत नाव नसल्याने मतदानाचा अधिकार कायमचा संपला असे समजण्याचे कारण नाही. संबंधित मतदारांना दावा सादर करून आपले नाव पुन्हा समाविष्ट करून घेण्याची संधी देण्यात आली आहे.
एसआयआर प्रक्रियेदरम्यान घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर डिजिटायझेशनसाठी आवश्यक असलेले फॉर्म जमा न होणे, मतदार उपलब्ध नसणे, स्थलांतर, मृत्यू, दुबार नोंदणी किंवा अन्य कारणांमुळे अनेक मतदारांची नावे प्रारुप यादीत दिसत नसल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रात सुमारे 2 कोटी 7 लाख मतदारांचा रेकॉर्ड प्रारुप मतदार यादीत समाविष्ट झालेला नाही. संबंधित मतदारांचे फॉर्म जमा न झाल्यामुळे त्यांचा रेकॉर्ड डिजिटाइज होऊ शकला नसल्याचे सांगण्यात आले आहे.
Hiwarkhed Municipal Council : हिवरखेड नगरपरिषदेत नगरसेवकाला मारहाण; सीसीटीव्ही कक्ष पोलिसांकडून सील
दिल्लीतही एसआयआरनंतर मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारुप यादीतून बाहेर राहिली आहेत. दिल्लीत एकूण 1 कोटी 45 लाख नोंदणीकृत मतदारांपैकी 47 लाख 56 हजार 722 मतदारांची नावे प्रारुप यादीत नसल्याचे समोर आले आहे. सुमारे 97 लाख 53 हजार 507 मतदारांचा रेकॉर्ड डिजिटाइज करण्यात आला आहे. एसआयआर प्रक्रियेत गैरहजर मतदार, स्थलांतरित व्यक्ती, मृत मतदार, दुबार नोंदणी, विदेशी नागरिक तसेच अन्य कारणांमुळे काही नावे प्रारुप यादीतून वगळण्यात आली आहेत. याशिवाय पडताळणीदरम्यान आवश्यक फॉर्म उपलब्ध न झाल्यानेही काही मतदारांचा रेकॉर्ड डिजिटाइज झालेला नाही.
त्यामुळे प्रारुप यादीत नाव नसलेल्या मतदारांनी घाबरून जाण्याची गरज नाही. आपला दावा सादर करून आवश्यक कागदपत्रांसह नाव पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्याची प्रक्रिया करता येणार आहे. मतदारांनी सर्वप्रथम भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत मतदार सेवा संकेतस्थळावर जाऊन आपले नाव प्रारुप मतदार यादीत आहे की नाही, हे तपासावे. भारत निवडणूक आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ : https://voters.eci.gov.in/प्रारुप यादीत नाव सापडले नाही, तर त्यानंतर आपल्या परिस्थितीनुसार योग्य फॉर्म भरून दावा किंवा हरकत सादर करावी.
ज्या मतदारांचे नाव प्रारुप मतदार यादीत नाही, त्यांनी 31 ऑगस्ट 2026 ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत दावा सादर करायचा आहे. यासाठी फॉर्म क्रमांक 6 भरून आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. महत्त्वाचे म्हणजे 30 सप्टेंबरनंतर दावे आणि हरकती स्वीकारण्याची मुदत संपणार असल्याने संबंधित मतदारांनी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रारुप मतदार यादीत एखाद्या अपात्र व्यक्तीचे नाव चुकीने समाविष्ट झाले असल्यास त्या नावावर हरकत घेण्यासाठी फॉर्म क्रमांक 7 वापरता येतो. मतदार ओळखपत्रातील नावाची स्पेलिंग, पत्ता किंवा अन्य तपशीलांमध्ये दुरुस्ती करायची असल्यास फॉर्म क्रमांक 8 चा वापर करता येतो. पत्ता बदलल्यासही संबंधित प्रक्रिया फॉर्म 8 द्वारे करता येते.
प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मतदारांना दावा आणि हरकत सादर करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. प्राप्त दावे आणि हरकतींची नोंद घेऊन त्यांची प्रक्रिया 29 ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर 4 नोव्हेंबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे प्रारुप यादीत तुमचे नाव आहे की नाही, हे आताच तपासा. नाव नसल्यास 30 सप्टेंबरपूर्वी फॉर्म 6 भरून दावा सादर करा. प्रारुप यादीतील नावाबाबतची चूक किंवा अन्य हरकत असल्यास योग्य फॉर्मद्वारे प्रक्रिया पूर्ण करा. अंतिम यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी आपली नोंद व्यवस्थित आहे याची खात्री करणे मतदारांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
__








