Internal conflicts within Ajit pawar NCP in Nagpur: राज्यात सत्ता असूनही कार्यकर्त्यांची कामे होत नसल्याचा संताप
Nagpur अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील निष्क्रीय पदाधिकाऱ्यांना बदलण्याचे संकेत मिळताच नागपूर ग्रामीण राष्ट्रवादीत मोठा स्फोट झाला आहे. पक्षाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष कोणालाही विश्वासात घेत नाहीत आणि पक्षात सर्वांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला असल्याने पक्षाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे, असा संताप व्यक्त करत संतप्त पदाधिकाऱ्यांनी थेट पक्ष नेतृत्वाविरोधातच एल्गार पुकारला आहे.
नागपूर ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश सरचिटणीस शिवराज (बाबा) गुजर यांच्या अध्यक्षतेखाली बजाज नगर येथील पक्ष कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांची खलबते पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील संघटनात्मक अडचणी, अंतर्गत गटबाजी, पक्षाच्या विलीनीकरणाबाबत पसरलेले गैरसमज, तालुकास्तरीय शासकीय कमिट्यांवरील नियुक्त्या आणि आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर सखोल चर्चा झाली.
बैठकीत पदाधिकाऱ्यांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला. राज्यात महायुतीची सत्ता असून पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री आहेत. तरीही नागपूर जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादी सत्तेबाहेर असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. पक्षात कुठलाही कार्यक्रम घेतला जात नाही, संघटन बांधणीचे प्रयत्न नाहीत आणि कार्यकर्त्यांची कामेही होत नाहीत. जिल्हाध्यक्ष कोणालाही बैठकीला बोलवत नसून पक्षातील सर्वांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला असल्याचा थेट आरोप बैठकीत करण्यात आला.
या बैठकीत नागपूर जिल्हा ग्रामीणचे कार्याध्यक्ष नरेश अडसडे यांनी दिलेला धक्कादायक कबुलीनामा चर्चेचा विषय ठरला. मी पक्षाचा कार्याध्यक्ष फक्त कागदावरच राहिलो आहे. मला पक्षातर्फे कुठलेही अधिकृत निमंत्रण दिले जात नाही किंवा बैठकीलाही बोलावले जात नाही. त्यामुळे मी नक्की कार्याध्यक्ष आहे की नाही, असा प्रश्न मलाच पडला आहे, अशा शब्दांत अडसडे यांनी आपला उद्वेग बाहेर काढला.
या वादळी बैठकीस प्रदेश सरचिटणीस राजेश माटे, ग्रामीण युवक अध्यक्ष सचिन चव्हाण, युवती जिल्हा अध्यक्ष अभिलाषा वनमाळी, व्यापारी आघाडीचे आशिष मदान, ओबीसी सेलचे निशिकांत चौधरी, संदीप सावरकर, अल्हाद जंगम, महाकाळकर गुरुजी, हर्षद ठक्कर, कपिल नारनवरे, अरुण मदनकर, बिरोसिंग तोमर, भुजंग भोजनकर, कुंडलिक राऊत यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीतील वादळामुळे नागपूर ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा असंतोष धुमसत असल्याचे उघड झाले आहे.








