rohit-pawar-attack-sunetra-pawar-ajit-pawar-plane-crash-investigation-pawar-family-dispute : अजित पवारांच्या विमान अपघातावरून, पवार कुटुंबातील मतभेद चव्हाट्यावर
Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीवरून पवार कुटुंबातील राजकीय मतभेद पुन्हा समोर आले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी अपघाताला अनेक महिने उलटूनही गुन्हा दाखल न झाल्याबद्दल प्रश्न उपस्थित केल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तपास यंत्रणांवर विश्वास असल्याचे सांगत या प्रकरणाचे राजकारण करू नये, अशी भूमिका घेतली. आता आमदार रोहित पवार यांनी थेट सुनेत्रा पवार आणि सत्ताधारी राष्ट्रवादीवर निशाणा साधत आक्रमक भूमिका मांडली आहे.
“अजित पवार माझे काका होते आणि माझे नेतेही होते. त्यांच्या मृत्यूचा योग्य तपास व्हावा, ही एका पुतण्याचीच नव्हे तर त्यांच्या कार्यकर्त्यांची आणि राज्यातील कोट्यवधी लोकांची इच्छा आहे,” असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. सरकारमध्ये असलेल्या लोकांनी अजित पवारांना मित्र मानले, मात्र त्यांना न्याय देण्यात ते अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला. अपघाताच्या तपासासाठी आणि एफआयआर दाखल करण्यासाठी आपण राज्यातील तीन ठिकाणी जाऊन आलो; मात्र दाद मिळाली नाही, असा दावा रोहित पवार यांनी केला. कर्नाटकात या प्रकरणी एफआयआर दाखल होऊ शकतो, तर महाराष्ट्र सरकारला याची लाज वाटायला हवी, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.
Shobha Bachhav : खासदाराचा फोन हॅक करून पैसे उकळण्याचा प्रयत्न !
याच मुद्द्यावरून रोहित पवार यांनी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसला थेट लक्ष्य केले. अजित पवारांच्या पक्षातील सुमारे ४० आमदारांनी विमान अपघाताचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली होती. त्यासाठी सत्तेत असलेल्या आमदारांना सरकारला स्मरणपत्र द्यावे लागते आणि त्यानंतरही त्यांची मागणी दुर्लक्षित होत असेल, तर ही गंभीर बाब असल्याचे रोहित पवार म्हणाले. यावेळी त्यांनी ‘स्वाभिमान’ हा मुद्दा पुढे करत सत्ताधारी गटाला डिवचले. “स्वाभिमान असता तर सत्तेच्या बाहेर गेले असते. स्वाभिमान सगळ्यांकडे असतोच असे नाही; तो टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागतो,” अशा शब्दांत त्यांनी टीका केली.
दरम्यान, अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासासंदर्भात आपण महत्त्वाचे सादरीकरण करणार होतो; मात्र आणखी काही माहिती समोर येत असल्याने पत्रकार परिषद पुढे ढकलल्याचेही रोहित पवार यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणात ते पुढे कोणते नवे पुरावे किंवा मुद्दे मांडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अजित पवारांच्या मृत्यूच्या चौकशीवरून आधी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा वाद दिसत होता. आता त्यात रोहित पवारांची आक्रमक एन्ट्री झाल्याने पवार कुटुंबातील राजकीय मतभेदांना पुन्हा धार आली आहे. विशेष म्हणजे हा संघर्ष आता केवळ चौकशीपुरता मर्यादित न राहता सत्तेतील सहभाग, स्वाभिमान आणि अजित पवारांना न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेपर्यंत पोहोचला आहे.
__








