wrestler-ashwini-paul-three-children-naldurg-fort-tragedy-umarga-dharashiv : कुस्तीपटू अश्विनी पौळ यांच्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
Dharashiv : राष्ट्रीय स्तरावर कुस्तीच्या आखाड्यात महाराष्ट्राचा झेंडा उंचावणाऱ्या महिला कुस्तीपटू अश्विनी मनोहर पौळ यांच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. उमरगा तालुक्यातील व्हंताळ गावच्या रहिवासी असलेल्या अश्विनी पौळ यांनी आपल्या तीन लहान मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून दरीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत अश्विनी पौळ आणि त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य यांचा मृत्यू झाला. अडीच वर्षांच्या जुळ्या मुलींपैकी क्रांती हिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसरी मुलगी वीरा गंभीर जखमी असून, तिच्यावर धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कुस्तीच्या मैदानात प्रतिस्पर्ध्यांना चितपट करणारी आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखली जाणारी अश्विनी आज मात्र आपल्या तीन लेकरांसह काळाच्या पडद्याआड गेल्याने क्रीडा क्षेत्रातूनही हळहळ व्यक्त होत आहे. अश्विनी यांना कुस्तीचे बाळकडू त्यांच्या कुटुंबातूनच मिळाले. मुलीने कुस्तीमध्ये नाव कमवावे, यासाठी त्यांच्या वडिलांनी घरातच कुस्तीची तालीम सुरू केली होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सराव करत त्यांनी राष्ट्रीय स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.
Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून विखे-पाटील टार्गेटवर
२००७ मध्ये केरळमधील तिरुवनंतपुरम येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर २००८ आणि २००९ मध्येही राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदकांची कामगिरी केली. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी तब्बल पाच सुवर्ण आणि सहा रौप्य पदके मिळवत महाराष्ट्राचा गौरव वाढवला. मात्र, आयुष्याच्या या टप्प्यावर त्यांच्या वैयक्तिक जीवनाला लागलेल्या वादळाने या यशस्वी खेळाडूचा जीवनप्रवास अत्यंत वेदनादायी पद्धतीने संपला.
या घटनेनंतर अश्विनी यांच्या वडिलांनी त्यांच्या पती आणि सासरच्या मंडळींकडून मानसिक व शारीरिक त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. याच त्रासाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा वडिलांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळण्याची शक्यता असून, पोलिसांकडून या आरोपांची चौकशी केली जात आहे.
Sharad Pawar : गणेशोत्सवातील डीजेवरून महाराष्ट्रात राजकीय वाद पेटला
एका बाजूला कुस्तीच्या आखाड्यात संघर्ष करून पदकांची कमाई करणारी खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला कौटुंबिक आयुष्यातील कथित छळाला सामोरी जाणारी आई अश्विनी पौळ यांच्या मृत्यूने या दोन टोकांमधील वेदनादायी वास्तव समोर आणले आहे. या घटनेने केवळ एका कुटुंबावर शोककळा पसरलेली नाही, तर कौटुंबिक हिंसाचार, मानसिक छळ आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अश्विनी पौळ यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक गुणवान कुस्तीपटू गमावली; मात्र त्यांच्या तीन मुलांच्या आयुष्यावर आलेली ही काळी छाया मन सुन्न करणारी आहे. आता या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सत्य समोर यावे आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, हीच अपेक्षा व्यक्त होत आहे.








