व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Sharad Pawar : गणेशोत्सवातील डीजेवरून महाराष्ट्रात राजकीय वाद पेटला

Sharad Pawar : गणेशोत्सवातील डीजेवरून महाराष्ट्रात राजकीय वाद पेटला

ganeshotsav-dj-ban-maharashtra-political-controversy-sharad-pawar-support : भाजप सावध, शरद पवारांचा थेट डीजेबंदीला पाठिंबा

Mumbai: गणेशोत्सवात डीजे वाजवायचा की नाही, या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. डीजे आणि लेझर लाईट्सच्या वापरावरून सुरू झालेला वाद आता राजकीय पटलावरही पोहोचला असून, सत्ताधारी भाजपमध्ये या मुद्द्यावर वेगवेगळ्या भूमिका समोर येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संवेदनशील विषयावर थेट भूमिका घेणे टाळले असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र डीजेबंदीच्या मागणीला स्पष्ट पाठिंबा दिला आहे.

पुण्यात डीजेच्या मोठ्या आवाजाविरोधात भूमिका मांडणारे विद्यानंद बापट यांना मारहाण झाल्याच्या घटनेनंतर हा वाद राज्यभर चर्चेत आला. त्यानंतर डीजेच्या वापरावर बंदी घालावी की पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय मंडळांवर सोपवावा, यावरून विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शरद पवार यांनी विद्यानंद बापट यांच्या भूमिकेला पाठिंबा देत डीजेच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील नेते या विषयावर सावध भूमिका घेत असताना विरोधी पक्षातील एका प्रमुख नेत्याने थेट डीजेबंदीची भूमिका घेतल्याने राजकीय चर्चेला नवे वळण मिळाले आहे.

Ganeshotsav Dj Ban : स्वकियांचा विरोध झुगारून संदीप जोशी आक्रमक !

विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यातील नागपुरातही भाजपमध्ये या मुद्द्यावर मतभेद दिसून येत आहेत. माजी महापौर संदीप जोशी यांनी केवळ गणेशोत्सवापुरती मर्यादित न ठेवता डीजेच्या वापरावर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्याचवेळी मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनी या भूमिकेला विरोध केला आहे. केवळ हिंदू सणांच्या वेळीच प्रशासनाला ध्वनिप्रदूषण आणि पर्यावरणाची आठवण होते का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शहरात डीजे आणि डोळ्यांना इजा पोहोचवू शकणाऱ्या लेझर लाईट्सच्या वापरावर १ नोव्हेंबरपर्यंत बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे पुण्यातून सुरू झालेला डीजेबंदीचा वाद आता नागपूरसह राज्यातील इतर भागांतही पोहोचला आहे. गणेशोत्सव हा धार्मिक तसेच सामाजिकदृष्ट्या संवेदनशील विषय असल्याने प्रमुख राजकीय पक्ष आणि नेते या मुद्द्यावर सावध भूमिका घेताना दिसत आहेत. मात्र, शरद पवार यांनी डीजेबंदीला दिलेला स्पष्ट पाठिंबा आणि नागपुरातील भाजप नेत्यांमधील परस्परविरोधी भूमिका यामुळे या वादाला राजकीय रंग चढला आहे.

DJ ban : डीजे हवा की आरोग्य? कान-डोळे उध्वस्त करण्याचा अट्टहास नेमका कुणासाठी?

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या वापराबाबत प्रशासन, गणेश मंडळे आणि राजकीय पक्षांची भूमिका काय राहते, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. डीजेबंदीचा हा मुद्दा आगामी काळात आणखी तापण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!