व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Agriculture zone : पालकमंत्र्यांचा हुडकेश्वर – नरसाळा अजूनही ‘कृषी झोन’मध्येच

Agriculture zone : पालकमंत्र्यांचा हुडकेश्वर – नरसाळा अजूनही ‘कृषी झोन’मध्येच

hudkeshwar-narsala-agriculture-zone-mns-warning-nagpur : मनसेचा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा

Nagpur : हुडकेश्वर – नरसाळा परिसराचा अनेक वर्षांपूर्वी नागपूर महानगरपालिका हद्दीत समावेश करण्यात आला असतानाही नियोजन प्रक्रियेत हा परिसर अद्याप ‘कृषी झोन’ म्हणून दाखवला जात असल्याने नागरिकांना मालमत्ता व्यवहार करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महसूल विभागाकडून एकीकडे ‘एक जिल्हा, एक नोंदणी’ उपक्रम राबविला जात असताना, दुसरीकडे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदारसंघातील या परिसरात मनपा आणि महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे प्रशासकीय घोळ कायम असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.

या गंभीर प्रशासकीय विसंगतीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनसेचे शहर अध्यक्ष विशाल बडगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी तसेच नागपूर महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. मनपा हद्दीत समावेश झाल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरी विकास झाला असतानाही जुन्या कृषी नोंदींचा आधार घेत नागरिकांच्या विक्रीखत नोंदणी, मालमत्ता हस्तांतरण आणि फेरफार नोंदीमध्ये अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

Vedprakash arya : एनआयटी अधिकाऱ्यांचे भू-माफियांशी साटेलोटे !

४ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार पात्र मालमत्तांच्या व्यवहारांबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी मनसेने केली आहे. केवळ ‘कृषी’ अशी नोंद असल्याच्या कारणावरून नागरिकांचे मालमत्ता व्यवहार सरसकट रोखू नयेत, अशी भूमिका मनसेने मांडली आहे. हुडकेश्वर – नरसाळा परिसरातील प्रलंबित मालमत्ता प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यासाठी विशेष शिबिर आयोजित करावे, तसेच मनपा, महसूल आणि नोंदणी विभागाची संयुक्त बैठक घेऊन नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी स्पष्ट कार्यपद्धती निश्चित करावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Maratha Reservation : फडणवीसांच्या ‘वर्षा’वर मध्यरात्री खलबतं; पुढे काय?

मनपा हद्दीत समावेश होऊन अनेक वर्षे उलटून गेल्यानंतरही नागरिकांना ‘कृषी झोन’च्या नोंदीच्या नावाखाली मालमत्ता व्यवहारांसाठी अडविणे ही गंभीर प्रशासकीय विसंगती असल्याचे मनसेने म्हटले आहे. त्यामुळे या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे. येत्या १५ दिवसांत ठोस कार्यवाही न झाल्यास नागरिकांच्या मालमत्ता हक्कांसाठी ‘मनसे स्टाइल’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसे शहर अध्यक्ष विशाल बडगे यांनी दिला आहे. या वेळी मनसे शहर सचिव घनश्याम निखाडे, शहर उपाध्यक्ष शशांक गिरडे, गौरव पुरी, शहर सचिव निमिष पाटणकर, आदित्य राघोर्ते यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!