व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Election Commission : महाराष्ट्रातील १.२२ कोटी मतदारांना नोटिसा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Election Commission : महाराष्ट्रातील १.२२ कोटी मतदारांना नोटिसा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

maharashtra-sir-voter-list-1-22-crore-voters-notices-election-commission : मतदारांच्या नावावर आक्षेप घेणाऱ्यालाच पुरावे द्यावे लागणार

 

Mumbai : महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण अर्थात एसआयआर मोहिमेला वेग आला असून, प्रारूप मतदार यादीत तब्बल १ कोटी २२ लाख २४ हजार मतदारांच्या गणना प्रपत्रातील माहितीमध्ये विसंगती आढळून आली आहे. या मतदारांना आवश्यक अतिरिक्त कागदपत्रे आणि पुरावे सादर करण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दरम्यान, प्रारूप मतदार यादीतील एखाद्या मतदाराच्या नावावर आक्षेप घेणाऱ्यालाच त्या मतदाराच्या अपात्रतेचे पुरावे सादर करावे लागणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

एसआयआर मोहिमेपूर्वी महाराष्ट्रात एकूण ९ कोटी ७८ लाख ५४ हजार ४९ मतदार होते. प्रारूप मतदार यादीत त्यापैकी ७ कोटी ७१ लाख ६५ हजार ५६२ मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ३ कोटी ९५ लाख ८९ हजार ९०५ पुरुष, ३ कोटी ७५ लाख ७२ हजार ५७० महिला आणि ३ हजार ८७ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.

Manoj Jarange : आंदोलनाची धग राज्यभर; सरकारचा संयमाचा सूर, तर जरांगेंचा आक्रमक पलटवार

तर जुन्या मतदार यादीतील २ कोटी ६ लाख ८८ हजार ४८७ मतदारांची नावे प्रारूप यादीतून वगळण्यात आली आहेत. यामध्ये सुमारे ३४ लाख मयत मतदारांची नावे रद्द करण्यात आली आहेत. तसेच सुमारे १७ लाख मतदारांची नावे दोन मतदारसंघांत आढळल्याने त्यापैकी एका ठिकाणची नावे वगळण्यात आली आहेत. नातेवाईकांच्या माहितीत विसंगती; ५९ लाख मतदार ‘अनमॅप्ड’ प्रारूप मतदार यादीत समाविष्ट असलेल्या ७ कोटी ७१ लाख ६५ हजार ५६२ मतदारांपैकी १ कोटी २२ लाखांहून अधिक मतदारांच्या गणना प्रपत्रात काही त्रुटी आढळल्या आहेत. यामध्ये नातेवाईकांनी दिलेल्या माहितीसोबत विसंगती असलेल्या मतदारांची संख्या ६२ लाख ४८ हजार २८१ आहे. तर नातेवाईकांशी जोडणी न झालेल्या अर्थात ‘अनमॅप्ड’ मतदारांची संख्या ५९ लाख ७५ हजार ६२६ आहे.

मुंबईसह पुणे, नागपूर आणि इतर काही मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती आढळली आहे. मालाड, धारावी, पनवेल, ओवळा-माजिवडा, कल्याण ग्रामीण, खडकवासला, चिंचवड, हडपसर, सोलापूर दक्षिण, नागपूर पूर्व, नागपूर पश्चिम, नागपूर उत्तर, हिंगणा आणि बडनेरा या मतदारसंघांमध्ये प्रत्येकी एक लाखांहून अधिक मतदारांच्या माहितीमध्ये विसंगती असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, विशिष्ट समाजातील मतदारांची नावे वगळण्यासाठी मोठ्या प्रमाणात आक्षेप दाखल होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. प्रारूप मतदार यादीतील एखाद्या मतदाराच्या नावावर आक्षेप घ्यायचा असल्यास संबंधित व्यक्तीने त्याच विधानसभा मतदारसंघातील रहिवासी असणे आवश्यक आहे.

Mundhwa land Scam : पार्थ पवारांना आरोपी का केले नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारावर हायकोर्टाचा सवाल

 

नमुना-७ अर्जाद्वारे मतदाराचे नाव वगळण्याची मागणी करता येणार असली, तरी आक्षेप घेणाऱ्याला संबंधित मतदार अपात्र असल्याचे पुरावेही सादर करावे लागतील. तसेच ज्याच्या नावावर आक्षेप घेण्यात आला आहे, त्या मतदारालाही सुनावणीवेळी उपस्थित राहून आपले पुरावे सादर करण्याची संधी दिली जाणार आहे.
राज्याचे निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी मुंबई महापालिका आयुक्त तसेच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दावे आणि हरकतींची छाननी करताना विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे एसआयआर प्रक्रियेत आता मतदारांच्या नावांची पडताळणी आणि त्यावरील हरकती या दोन्ही बाबींवर निवडणूक आयोगाचे बारकाईने लक्ष असणार आहे.

____

error: Content is protected !!