Parinay Fuke claims Rohit Pawar to joining the Congress : सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्याशी मतभेद असल्यामुळे निर्णय घेतल्याचा दावा
Nagpur राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट) आमदारांमध्ये अंतर्गत कलह सुरू असून, आमदार रोहित पवार पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर नाराज असल्यामुळे ते लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा खळबळजनक दावा भाजप आमदार परिणय फुके यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना केला.
रोहित पवार यांचे पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी अजिबात पटत नसून, त्यांनी जयंत पाटील यांनी मार्गदर्शकाची भूमिका घेऊन रस्त्यावर उतरणाऱ्या कार्यकर्त्याला प्रदेशाध्यक्ष करण्याची मागणी केली होती, याकडे फुके यांनी लक्ष वेधले. रोहित पवार सातत्याने विदर्भाचे दौरे करत असून, भंडाऱ्यात जाऊन त्यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांची भेट घेतली होती, ती केवळ पटोले यांना खूश करण्यासाठीच होती असा टोलाही त्यांनी लगावला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रोहित पवार यांनी घातपाताचा संशय व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली होती; मात्र शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी यावर बोलणे टाळत हा अपघातच असल्याचे मानल्याने रोहित पवार यांची पक्षातील वेगळी पडलेली भूमिका स्पष्ट झाली आहे. दरम्यान, रोहित पवार यांनी दिल्लीत जाऊन राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांची प्रशंसा केली होती, तसेच एमपीएससी पेपरफुटीच्या आंदोलनात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही रोहित पवार आणि आमची लाईन एकच असल्याचे म्हटले होते, यावरून रोहित पवार यांचा काँग्रेसकडील कल स्पष्ट दिसत असल्याचे फुके म्हणाले.
Amruta Fadnavis : गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशाला हरकत काय? राणेंच्या भूमिकेला अमृता फडणवीसांचा छेद
दुसऱ्या एका महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलताना फुके यांनी धान खरेदी आणि शेतकरी बोनसबाबत माहिती दिली. धान उत्पादकांच्या प्रश्नावर स्थापन करण्यात आलेल्या आमदारांच्या समितीसोबत छत्तीसगडचा अभ्यास दौरा केल्याचे सांगत, त्यांनी शेतकऱ्यांना चांगला भाव आणि बोनस देण्याची मागणी केली आहे. यावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुढील अधिवेशनापर्यंत शासकीय निर्णय काढण्याचे आश्वासन दिले असून, राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी १०० टक्के बोनस जाहीर करेल, असा विश्वास आमदार परिणय फुके यांनी व्यक्त केला.








