garba-muslim-entry-amruta-fadnavis-nilesh-rane-sanjay-raut : संजय राऊतांनी केली राणे नावाच्या पोपटाला आवरण्याची मागणी
Nagpur : गणेशोत्सवातील डीजेचा वाद ताजा असतानाच आता आगामी गरबा उत्सवात मुस्लिमांना प्रवेश देण्यावरून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. निलेश राणे यांनी मुस्लिमांना गरब्यात प्रवेशबंदीची मागणी करत नव्या वादाला तोंड फोडले असताना, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मात्र या भूमिकेशी असहमती दर्शवली आहे.
गरबा हा सांस्कृतिक आणि सर्वसमावेशक उत्सव असून, त्यात मुस्लिमांनी सहभाग घेतला तर काय हरकत आहे, असा रोखठोक सवाल करत त्यांनी राणेंच्या भूमिकेला छेद दिला आहे. मुस्लिमांच्या धार्मिक कार्यक्रमांत हिंदूंना प्रवेश दिला जात नसल्याचे सांगत, हिंदूंच्या उत्सवातही मुस्लिमांना प्रवेश नाकारण्याची मागणी राणे यांनी केली होती. मात्र, नागपुरात माध्यमांशी बोलताना अमृता फडणवीस यांनी ही मागणी फेटाळून लावत सर्वसमावेशकतेचा पुरस्कार केला.
Sanjay Raut : जरांगे बनले महायुती सरकारच्या गळ्याचा फास, मरणासाठी दिले सोडून
विशेष म्हणजे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमृता फडणवीस यांच्या या वक्तव्याचे तातडीने स्वागत केले आहे. “आम्ही अमृता फडणवीस यांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहोत,” असे सांगत राऊत यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांनी समाजात विष कालवणाऱ्या आपल्या लाडक्या पोपटाला आता आवरावे, असा घणाघाती टोलाही राऊत यांनी लगावला आहे.
यामुळे सत्ताधाऱ्यांमधील अंतर्गत मतभेद आणि विरोधकांचा हल्लाबोल यामुळे गरब्याचा वाद अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. निलेश राणे हे सातत्याने मुस्लिम समाजाच्या विरोधात वक्तव्य करून महायुतीलाच कोंडीत पकडत आहेत. यावरून भाजपमधील मुस्लिम समाजाच्या नेत्यांमध्येही रोष आहे. त्यांना आवरण्याची मागणी यापूर्वीदेखील करण्यात आली आहे.








