brics-summit-2026-putin-india-xi-jinping-modi-delhi-brics-summit : दिल्लीतील ‘ब्रिक्स’कडे जगाचे लक्ष, मोदींसोबतच्या चर्चांकडे विशेष नजर
New Delhi : भारताच्या राजधानीत १२ आणि १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या १८व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. ‘भारत मंडपम’ येथे होणाऱ्या या परिषदेसाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारतात दाखल झाले असून, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हेही दिल्लीत येणार आहेत. अमेरिका-चीन व्यापार तणाव, युक्रेन युद्ध, बदलते जागतिक सत्तासमीकरण आणि ‘ग्लोबल साऊथ’चा वाढता प्रभाव या पार्श्वभूमीवर यंदाची ब्रिक्स परिषद अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
शी जिनपिंग तब्बल सात वर्षांनंतर भारत दौऱ्यावर येत असल्याने त्यांच्या भेटीकडे विशेष घडामोड म्हणून पाहिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय चर्चाही होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमधील राजकीय संबंध सुधारण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची ठरू शकते. मात्र व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक सहकार्याच्या आघाडीवर अद्याप अनेक आव्हाने कायम आहेत.
Sir Voter list : २ कोटी मतदार गायब, १.२२ कोटी नोंदींमध्ये घोळ
पुतीन यांच्या भारत दौऱ्यात भारत-रशिया संरक्षण आणि ऊर्जा सहकार्याला विशेष महत्त्व मिळण्याची शक्यता आहे. एस-४०० प्रणालीचा उर्वरित पुरवठा, सुखोई-५७ लढाऊ विमानांचा प्रस्ताव, ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या संभाव्य सुधारणांसह संरक्षण क्षेत्रातील विविध मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. याशिवाय नागरी अणुऊर्जा, ऊर्जा, अंतराळ आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्याचाही आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे.
ब्रिक्स शिखर परिषदेसोबतच पुतिन ब्रिक्स व्यवसाय मंचाच्या पूर्ण अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. भारत-रशिया व्यापार, गुंतवणूक आणि तांत्रिक सहकार्य वाढविण्याच्या उपायांवरही चर्चा अपेक्षित आहे. दरम्यान, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांच्या सहभागाचीही शक्यता आहे. मोदी-पेजेशकियन चर्चेत पश्चिम आशियातील तणाव, ऊर्जा सुरक्षा आणि भारत-इराण संबंधांवर चर्चा होऊ शकते.
त्यामुळे मोदी, जिनपिंग, पुतीन आणि पेजेशकियन यांची एकाच व्यासपीठावरील उपस्थिती जागतिक राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ब्रिक्सच्या या परिषदेमुळे भारताला जागतिक दक्षिणेतील नेतृत्वाची भूमिका अधिक ठळकपणे मांडण्याची संधी मिळणार असून, दिल्लीतील चर्चांकडे अमेरिका, युरोपसह संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.








