After a battle over credit, Akola finally gets its cultural centre : ३० कोटींचा खर्च; १२०० प्रेक्षकांची आसनव्यवस्था, अद्ययावत सुविधांनी सज्ज वास्तू
Akola अकोल्यातील सांस्कृतिक भवनाचा प्रवास केवळ बांधकाम पूर्ण होण्यापुरता मर्यादित नसून, त्यामागे राजकीय श्रेयवादाचीही एक कहाणी आहे. सत्ताधारी पक्षातीलच लोकप्रतिनिधींमध्ये या प्रकल्पाच्या श्रेयावरून वेळोवेळी राजकीय कुरबुरी झाल्यानंतर अखेर रामदासपेठ येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावर सुमारे ३० कोटी रुपये खर्चून अद्ययावत सांस्कृतिक भवन साकारले आहे. कला, संगीत, नाट्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी अकोलेकरांना आता हक्काचे आणि आधुनिक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
गेल्या सात-आठ वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकल्पाचे काम निधीअभावी रखडले होते. मोठे नाट्यप्रयोग, संगीत मैफिली, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने आणि परिसंवादांसाठी शहरात मर्यादित सुविधा उपलब्ध असल्याने कलाकार व आयोजकांना विविध पर्यायांवर अवलंबून राहावे लागत होते. नव्या सांस्कृतिक भवनामुळे ही उणीव भरून निघण्याची अपेक्षा आहे.
Loksabha Video : अमरावती लोकसभेसाठी भाजपमध्ये आतापासूनच चुरस?
१५ कोटींनी सुरुवात; निधीअभावी ब्रेक
तत्कालीन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या कार्यकाळात सांस्कृतिक भवनाच्या उभारणीला मंजुरी मिळाली होती. शासनाकडून पहिल्या टप्प्यात १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. मात्र, पुढील निधी उपलब्ध न झाल्याने काम रखडले.
सावरकरांच्या पाठपुराव्याने दुसऱ्या टप्प्याला गती
दरम्यान, विधिमंडळातील भाजपचे मुख्य प्रतोद तथा आमदार रणधीर सावरकर यांनी प्रकल्पासाठी पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्यानंतर दुसऱ्या टप्प्यासाठी आणखी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यामुळे रखडलेल्या कामाला पुन्हा गती मिळाली आणि आता भवनाचे काम पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या श्रेयावरून यापूर्वी सुरू असलेल्या राजकीय चर्चेलाही आता नवे वळण मिळाले आहे.
१२०० प्रेक्षकांची आसनव्यवस्था
सांस्कृतिक भवनात सुमारे १२०० प्रेक्षकांची आसनव्यवस्था आहे. भव्य रंगमंच, अद्ययावत ध्वनीव्यवस्था, आधुनिक विद्युत व्यवस्था, गॅलरी तसेच प्रशस्त आणि आकर्षक आसनव्यवस्था या सुविधांचा समावेश आहे. नाटक, संगीत, नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने आणि परिसंवादांसाठी या वास्तूचा उपयोग करता येणार आहे.
ऑक्टोबरमध्ये लोकार्पण
रामदासपेठ येथील सांस्कृतिक भवनासह परिसरातील दोन जलतरण तलाव आणि अन्य विकासकामांचे लोकार्पण ऑक्टोबरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचे नियोजन आहे.








