Anil Deshmukh under scrutiny in Disha Salian case after his name appears in CBI FIR : वडील सतीश सालियन यांनी नोंदवलेल्या जबाबाच्या आधारे एफआयआरची नोंद
Nagpur सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा तपास न्यायालयाने सीबीआयकडे सोपवल्यानंतर सीबीआयने दाखल केलेल्या नव्या एफआयआरमुळे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी नोंदवलेल्या जबाबाच्या आधारे हा एफआयआर नोंदवण्यात आला असून, महाविकास आघाडी सरकारच्या काळात सत्ता आणि सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा थेट आरोप देशमुखांवर करण्यात आला आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनिल देशमुख गृहमंत्री असताना तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी त्यांच्यावर दरमहा १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश दिल्याचा गंभीर आरोप केला होता, ज्यामुळे देशमुखांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणात ईडी आणि सीबीआयने देशमुखांच्या घर व शैक्षणिक संस्थांवर छापे टाकून कारवाई केली होती, ज्यानंतर त्यांना सुमारे एक वर्ष तुरुंगात राहावे लागले होते.
जामिनावर बाहेर आल्यानंतर अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून आपल्याला राजकीय कटात गोवण्यात आल्याचा आरोप वारंवार केला होता. मात्र, आता दिशा सालियन प्रकरणात सीबीआयने थेट एफआयआर दाखल केल्यामुळे देशमुखांसमोर नवे संकट उभे राहिले आहे.
Manoj Jarange : जरांगे म्हणतात,“आरक्षण महत्त्वाचं, दौरा नाही”
सतीश सालियन यांनी आपल्या नव्याने नोंदवलेल्या जबाबात अनिल देशमुखांसह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि तत्कालीन पोलीस अधिकारी परमबीर सिंह व सचिन वाझे यांचीही नावे दिली आहेत. दिशाचा इमारतीवरून पडून झालेला मृत्यू ही आत्महत्या नसून तिला आत्महत्या करण्यास भाग पाडले गेले होते, असा दावा करत आरोपींना वाचवण्यासाठी तत्कालीन गृहमंत्रालयाने पोलिसांचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Narendra Mehta : मोदींच्या वर्गमित्राचा जमीन वाद अखेर मार्गी !
दरम्यान, या कारवाईवर महाविकास आघाडीने तीव्र आक्षेप घेतला असून, सत्ताधारी पक्ष सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे, तर आमदार रोहित पवार यांनी राजकीय हेतूने प्रेरित होऊन ही पावले उचलली जात असल्याचे म्हटले आहे. आधीच १०० कोटींच्या खटल्याचा सामना करत असलेल्या अनिल देशमुखांवर आता दिशा सालियन प्रकरणातही सीबीआयचा शिकंजा कसल्याने त्यांच्यापुढील न्यायालयीन आणि राजकीय अडचणी अधिकच गडद झाल्या आहेत.








