व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Vidarbha Farmers : शेतकऱ्यांच्या व्यथांसाठी छातीवर दगड; अकोल्यात शंभू सेनेचे अभिनव आंदोलन

Vidarbha Farmers : शेतकऱ्यांच्या व्यथांसाठी छातीवर दगड; अकोल्यात शंभू सेनेचे अभिनव आंदोलन

Shambhu Sena stages protest with stones placed on their chests over farmers’ demands : कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी; हेक्टरी एक लाखांची नुकसानभरपाई, कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी सरकारचे वेधले लक्ष

Akola अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे अकोला जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडल्याचा मुद्दा उपस्थित करीत शंभू सेना सामाजिक संघटनेने मंगळवारी (१५ सप्टेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभिनव आंदोलन केले. आंदोलकांनी छातीवर दगड ठेवून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यंदा पावसाचे प्रमाण अपुरे आणि अनियमित राहिल्याने अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. पावसाअभावी सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद तसेच फळबागांसह विविध पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाला असून, शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडल्याचा दावा संघटनेने केला.

सरकारच्या निदर्शनास आणली ‘काळजावरची’ व्यथा

शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करीत असून, त्याच्या काळजावर दगड ठेवण्याची वेळ आली आहे, हा संदेश देण्यासाठी आंदोलनाची ही पद्धत निवडल्याचे संघटनेने सांगितले. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषिमंत्री यांना निवेदन देण्यात आले.

हेक्टरी एक लाखांच्या मदतीची मागणी

पावसाअभावी नुकसान झालेल्या गावांचे तातडीने सर्वेक्षण करून कोरडा दुष्काळ जाहीर करावा. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून पात्र शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच पीक विमा योजनेतील पात्र शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळवून देण्याची मागणी करण्यात आली.

Akola cultural centre : श्रेयवादाच्या राजकारणानंतर अखेर अकोल्यात सांस्कृतिक भवन साकारले

कर्ज पुनर्गठन, वीज आणि चाऱ्याचा मुद्दा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन, व्याजात सवलत आणि आवश्यक उपाययोजना कराव्यात. जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. पुढील हंगामासाठी बियाणे, खते आणि कृषी निविष्ठांसाठी आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही संघटनेने केली.

सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांना पिके वाचविण्यासाठी सलग २४ तास वीजपुरवठा करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच दुष्काळी सवलतींचा लाभ पात्र शेतकऱ्यांना तातडीने मिळावा आणि कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाने विशेष यंत्रणा उभारावी, अशी मागणी करण्यात आली.

कर्जमाफीच्या मुद्द्यावरही सरकारला घेरले

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणारे प्रोत्साहनपर अनुदान ५० हजारांवरून दोन लाख रुपये करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. तसेच २०१९ पूर्वी कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करावे, अशी मागणीही करण्यात आली.

“शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधार आहे. मात्र, तो सध्या अस्मानी आणि सुलतानी संकटांच्या कचाट्यात सापडला आहे. शासनाने तातडीने मागण्यांची दखल घेऊन मदत जाहीर करावी; अन्यथा शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा शंभू सेना सामाजिक संघटनेच्या वतीने देण्यात आला.

Loksabha Video : अमरावती लोकसभेसाठी भाजपमध्ये आतापासूनच चुरस?

आंदोलनात शंभू सेना सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अश्विन उद्धवराव नवले, सुभाष साबे, बार्शीटाकळी तालुका प्रमुख सचिन आगाशे, प्रमोद पाचपोर, राजेश दांडेकर, गणेश गोगे यांच्यासह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!