7,000 suggestions from students on MPSC functioning; demand for one-time fee payment : टास्क फोर्ससमोर २०० हून अधिक उमेदवारांनी मांडल्या मागण्या; परीक्षा ऑफलाइन ठेवण्याचीही मागणी
Amravati परीक्षेची घोषणा करतानाच नोंदणीपासून नियुक्तीपर्यंतचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करावे, परीक्षा ऑनलाइनऐवजी ऑफलाइन पद्धतीने घ्यावी आणि एकाच नोंदणी शुल्कात वर्षभरातील परीक्षांना बसण्याची संधी द्यावी, अशा प्रमुख सूचना स्पर्धा परीक्षांच्या उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभाराबाबत केल्या आहेत. सरळसेवा भरतीच्या इतर परीक्षा एमपीएससीच्या परीक्षांच्या आड येऊ नयेत, याचीही हमी देण्याची मागणी करण्यात आली.
एमपीएससीतील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने स्थापन केलेला उच्चस्तरीय टास्क फोर्स गुरुवारी, १७ सप्टेंबर रोजी अमरावतीत आला होता. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. एन. रामास्वामी सदस्य सचिव आहेत.
दोन्ही अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात परीक्षार्थींशी थेट संवाद साधला. यावेळी २०० हून अधिक उमेदवारांनी आपल्या सूचना आणि हरकती मांडल्या. अमरावती विभागातून समितीला सर्वाधिक सुमारे ७ हजार ई-मेल प्राप्त झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
प्रत्यक्ष चर्चेत मांडलेल्या सूचना आणि ई-मेलद्वारे प्राप्त झालेल्या सूचनांचा अभ्यास करून ‘बेस्ट ऑफ बेस्ट’ मॉडेल सुचविणारा अहवाल समिती राज्य सरकारला सादर करणार आहे.
No Hawkers Zone : ‘नो हॉकर्स झोन’मधील अतिक्रमणांवर सोमवारपासून बुलडोझर!
ऑफलाइन परीक्षेची मागणी
ऑफलाइन परीक्षा घेतल्यास उत्तरपत्रिकेच्या पुनर्तपासणीची सुविधा उपलब्ध होते. ऑनलाइन परीक्षेत ही सुविधा शक्य नसल्याने परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घेण्यात यावी, अशी मागणी उमेदवारांनी केली. परीक्षांचे वस्तुनिष्ठ स्वरूप कायम ठेवावे आणि दीर्घोत्तरी पद्धत लागू करू नये, अशी सूचनाही करण्यात आली.
प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून निकाल जाहीर होईपर्यंत तसेच मुलाखत आणि नियुक्तीपर्यंतच्या सर्व टप्प्यांसाठी कडक सुरक्षा व्यवस्था असावी, अशी मागणी करण्यात आली. या सर्व टप्प्यांचे वेळापत्रक परीक्षेच्या घोषणेवेळीच जाहीर करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असेही उमेदवारांनी सांगितले.
परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही देखरेख, प्रवेश नियंत्रण व्यवस्था आणि परीक्षा कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही करण्यात आली. परीक्षा पद्धतीत वारंवार बदल करून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करू नये. मोठा निर्णय घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, अशी सूचनाही उमेदवारांनी केली.
Amravati Crime : ऐकावं ते लवनलच! मृत युवकाला जिवंत करण्यासाठी जादूटोणा?
गैरप्रकारांची शिक्षा विद्यार्थ्यांना नको
अमरावती शहर युवक काँग्रेसनेही स्पर्धा परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी होणारा खेळ तातडीने थांबवण्याची मागणी केली. विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत करून परीक्षांची तयारी करतात. त्यामुळे परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकार आणि प्रशासकीय चुकांची शिक्षा विद्यार्थ्यांना मिळू नये, अशी भूमिका संघटनेने मांडली.
टास्क फोर्सने विद्यार्थ्यांच्या सर्व सूचनांचा अहवालात समावेश करून सरकारकडे ठोस शिफारशी कराव्यात, अशी मागणी युवक काँग्रेसने केली. यावेळी माजी प्रदेश सचिव समीर जवंजाळ यांच्यासह वैभव देशमुख, अक्षय साबळे, आशिष यादव, धनंजय बोबडे, प्रियाल मोहोड, आकाश गेडाम तसेच एआयएसएफचे सिनेट सदस्य कैलास चव्हाण आदी उपस्थित होते.








