tukaram-mundhe-shah-rukh-khan-ajay-devgn-tiger-shroff-fda-notice-pan-masala-ad : स्टारडम मोठं असलं तरी कायद्यापुढे वेगळी वागणूक नाही, तुकाराम मुंढेंची स्पष्ट भूमिका
Mumbai : बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकार शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना ‘विमल इलायची’च्या जाहिरातीप्रकरणी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. या कारवाईबाबत एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सेलिब्रिटी असणे ही कायदेशीर जबाबदारीपासून मुक्त होण्याची बाब नसल्याचे सांगितले आहे.
‘विमल इलायची’च्या जाहिरातीमधून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या पानमसाला उत्पादनाची अप्रत्यक्ष किंवा सरोगेट जाहिरात केली जात असल्याचा एफडीएचा आक्षेप आहे. याच पार्श्वभूमीवर ११ ऑगस्ट रोजी शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना नोटीस बजावण्यात आली होती. संबंधित जाहिरात थांबवणे, प्रचारात्मक मजकूर हटवणे आणि आपली भूमिका स्पष्ट करणे, अशा सूचना नोटीसमध्ये देण्यात आल्याचे वृत्त आहे.
या प्रकरणावर बोलताना तुकाराम मुंढे यांनी सेलिब्रिटींच्या लोकप्रियतेपेक्षा कायदेशीर जबाबदारीला महत्त्व असल्याचे स्पष्ट केले. “तुमच्या दृष्टीनं ते स्टार असतील; मात्र या प्रकरणात माझ्यासाठी ते जाहिरातदार आहेत,” अशी भूमिका त्यांनी मांडली. संबंधित व्यक्तींवर कारवाई ही त्यांच्या प्रसिद्धीच्या आधारे नव्हे, तर लागू असलेल्या कायदेशीर तरतुदींनुसार केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
Amravati Crime : ऐकावं ते नवलच ! मृत युवकाला जिवंत करण्यासाठी जादूटोणा?
मुंढे यांच्या म्हणण्यानुसार, तिन्ही कलाकारांपैकी दोघांनी नोटीसला उत्तर दिले आहे. या उत्तरांमध्ये उत्पादनाच्या निर्मितीची जबाबदारी संबंधित कंपनीची असल्याचा दावा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, एका अभिनेत्याकडून अद्याप उत्तर प्राप्त झाले नसल्याने त्या प्रकरणात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. संबंधित अभिनेत्याचे नाव त्यांनी जाहीर केलेले नाही. या प्रकरणात कलाकारांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाणार असून, नोटीस बजावणारे सहाय्यक आयुक्त पुढील सुनावणीची प्रक्रिया हाताळणार आहेत. त्यामुळे अंतिम निर्णयापूर्वी संबंधित कलाकारांचे स्पष्टीकरण आणि उपलब्ध कागदपत्रांचा विचार केला जाणार आहे.
दरम्यान, ‘विमल इलायची’च्या जाहिरातीमुळे पानमसाल्याची अप्रत्यक्ष जाहिरात होते का, हा या संपूर्ण वादाचा केंद्रबिंदू आहे. एफडीएने ही कारवाई सरोगेट जाहिरातीसंदर्भातील नियमांच्या आधारे केल्याचे स्पष्ट केले आहे.
cow protection : ‘गोमातेला पुरणपोळी खाऊ घालणे पुरेसे नाही; गोवंश संरक्षणासाठी ठोस भूमिका घ्या’
यामुळे बॉलिवूडच्या मोठ्या कलाकारांच्या जाहिराती आणि त्यांची कायदेशीर जबाबदारी याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. सेलिब्रिटींची लोकप्रियता मोठी असली, तरी जाहिरातीच्या माध्यमातून एखाद्या उत्पादनाचा प्रचार करताना लागू असलेल्या नियमांचे पालन करण्याची जबाबदारीही महत्त्वाची असल्याचे या प्रकरणातून पुढे आले आहे.








