व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Vidhan Parishad election : पदवीधरचा ‘गढ’ परत मिळवण्यासाठी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच; वंजारींविरुद्ध...

Vidhan Parishad election : पदवीधरचा ‘गढ’ परत मिळवण्यासाठी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच; वंजारींविरुद्ध ‘गडकरी-फडणवीस’ कोणाला उतरवणार

BJP race intensifies to reclaim the Graduates’ seat; who will Gadkari-Fadnavis field against Vanjari : विधान परिषदेच्या पाच मतदारसंघांत निवडणुकीचा बिगुल; २३ ऑक्टोबरला मतदान!

Nagpur : नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघासह राज्यातील एकूण पाच विधान परिषद जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नागपूर व्यतिरिक्त पुणे पदवीधर, औरंगाबाद पदवीधर आणि अमरावती व पुण्यातील शिक्षक मतदारसंघाच्या दोन जागांचा यात समावेश आहे. येत्या २३ ऑक्टोबर रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार असल्याने राज्यात पुन्हा एकदा राजकीय फटाके फुटण्याची चिन्हे आहेत. मागील निवडणुकीत काँग्रेस-महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांचा पराभव करत ऐतिहासिक विजय नोंदवला होता. भाजपचा हा पारंपरिक आणि मजबूत गढ मानला जात असल्याने या पराभवाचा वचपा काढण्यासाठी पक्ष आता कोणाला मैदानात उतरवणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसकडून अभिजित वंजारी यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असली, तरी भाजपमध्ये मात्र उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच सुरू आहे. माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्याकडे भाजपने नोंदणी प्रमुखाची जबाबदारी सोपवली असून, त्यांना निवडणुकीच्या तयारीचे संकेत देण्यात आल्याने त्यांचे नाव आघाडीवर आहे. दुसरीकडे, माजी आमदार अनिल सोले यांनीही वैयक्तिक स्तरावर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मागील निवडणुकीत ऐनवेळी तिकीट कापल्याने पक्षाला ही पारंपरिक जागा गमवावी लागली होती, असे मानणाऱ्या सोले समर्थकांमध्ये अजूनही नाराजी पाहायला मिळते.

पराभवानंतर संदीप जोशी यांना १३ महिन्यांसाठी विधान परिषदेवर पाठवून त्यांचे पुनर्वसन करण्यात आले होते, मात्र सोले उपेक्षितच राहिल्याने ते आता पुन्हा या मतदारसंघावर आपला दावा ठोकण्याच्या तयारीत आहेत. संदीप जोशी हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात, तर अनिल सोले आणि सुधाकर कोहळे हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे समर्थक आहेत. त्यामुळे शेवटी गडकरी आणि फडणवीस कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, यावरच नागपूर पदवीधरच्या जागेचे भवितव्य आणि भाजपच्या उमेदवाराची घोषणा अवलंबून असणार आहे.

तत्पूर्वी, भाजपकडून रिंगणात कोण उतरणार यावर तर्कवितर्कांना उधाण आले आहे. माजी आमदार सुधाकर कोहळे यांचे नाव पक्षाकडून जवळपास निश्चित मानले जात असतानाच, माजी आमदार व माजी महापौर अनिल सोले यांनी थेट दावेदारी ठोकून मतदारसंघात प्रचार सुरू केल्याने भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्याची चिन्हे आहेत.अनिल सोले यांनी विविध शैक्षणिक संस्थांच्या भेटीगाठी घेऊन प्रचाराचा नारळ फोडला आहे. उमेदवारीचा दावा मजबूत करण्यासाठी त्यांनी एका कार्यपुस्तिकेचे प्रकाशनही केले आहे. भाजपचे आजी-माजी आमदार तसेच शहराच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन वाढदिवसाच्या निमित्ताने सत्काराचा भव्य सोहळा आयोजित करून सोले यांचे नाव पुढे रेटण्याचा प्रयत्न सुरू आहे. सोशल मीडियावरील रिल्स आणि प्रत्यक्ष गाठीभेटींमुळे सोले उमेदवारीसाठी आरपारच्या लढाईच्या तयारीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

legislative council election : महाराष्ट्रातील ५ शिक्षक-पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीचा बिगुल !

या राजकीय घडामोडींवर संभाव्य उमेदवार सुधाकर कोहळे यांनी आक्रमक आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे. कोहळे म्हणाले, तिकीट मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्यांना थांबा किंवा लढा असे सांगणारा मी कोण? मात्र, पक्षाने माझे नाव निश्चित केले आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हीच आमचे उमेदवार आहात असे मला स्पष्ट सांगितले आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीसुद्धा यांची घोषणा केली आहे.

पक्षाने दिलेल्या आदेशानुसार मी वर्षभरापासून या मतदारसंघाची तयारी करत असून आतापर्यंत दोन लाख पदवीधरांची नोंदणी केली आहे. पक्ष जो निर्णय देईल तो मान्य असेल, पण सध्यातरी मीच पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे. मी गप्प बसण्यासाठी एवढी मेहनत घेत नाही, असा रोखठोक इशाराही त्यांनी दिला.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याच मतदारसंघातून आपल्या राजकीय कारकिर्दीची यशस्वी सुरुवात केली होती. गडकरींच्या सलग विजयांमुळे हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला. गडकरी केंद्रीय राजकारणात गेल्यानंतर ही धुरा अनिल सोले यांच्याकडे सोपवण्यात आली आणि त्यांनी ती यशस्वीपणे सांभाळली.

मात्र, सहा वर्षांच्या कार्यकाळानंतर नागपूर भाजपमध्ये मोठे राजकीय भूकंप झाले. गेल्या निवडणुकीत सोले यांचे तिकीट ऐनवेळी कापून माजी महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी देण्यात आली, ज्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता. तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेही विधानसभेचे तिकीट कापले गेले होते. या पक्षांतर्गत नाराजीचा आणि महाविकास आघाडीच्या समीकरणांचा फटका भाजपला बसला व काँग्रेसचे अभिजित वंजारी निवडून आले. भाजपला आपला पारंपरिक बालेकिल्ला गमवावा लागला.

Drought Relief : महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट गडद; मराठवाडा- विदर्भातील पिके संकटात

भाजपमधील अलिखित नियमानुसार जो नोंदणी प्रमुख असतो, तोच पदवीधर मतदारसंघाचा उमेदवार मानला जातो. पक्षाने या वेळी सुधाकर कोहळे यांची नोंदणी प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. तरीही, यापूर्वी भाजपने ऐनवेळी नियम डावलून धक्के दिल्याचा इतिहास असल्याने उमेदवारीबाबत अनिश्चितता कायम आहे. सोले आणि कोहळे यांच्यातील या थेट संघर्षामुळे येत्या दिवसांत भाजपमधील उमेदवारीचा वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

error: Content is protected !!