व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Loudspeaker Rules : लाऊडस्पीकरच्या परवानगीसाठी आता मंडळांना १ लाखांचा दणका !

Loudspeaker Rules : लाऊडस्पीकरच्या परवानगीसाठी आता मंडळांना १ लाखांचा दणका !

bombay-high-court-loudspeaker-rules-one-lakh-security-deposit-noise-pollution : नियम मोडल्यास अनामत रक्कम जप्त, मुंबई उच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

Mumbai : सण, धार्मिक मिरवणुका आणि सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान होणाऱ्या ध्वनी व वायुप्रदूषणाची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील आयोजकांना मोठा दणका दिला आहे. ध्वनिक्षेपक आणि मोठ्या आवाजाच्या ध्वनिव्यवस्थेच्या वापरासाठी परवानगी देताना मंडळे किंवा समूहांकडून किमान १ लाख रुपये सुरक्षा अनामत रक्कम घेण्याचा विचार करण्याचे निर्देश न्यायालयाने प्रशासनाला दिले आहेत. व्यक्तीला परवानगी देताना किमान ५० हजार रुपयांची अनामत रक्कम घेता येईल. ध्वनीच्या निर्धारित मर्यादेचे उल्लंघन झाल्यास ही रक्कम जप्त केली जाऊ शकते.

न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने धार्मिक मिरवणुका आणि उत्सवांमधील ध्वनीप्रदूषणाची स्वतःहून दखल घेत ही भूमिका मांडली. न्यायालयाने स्पष्ट केले की, उत्सव साजरे करण्याचा अधिकार असला तरी त्यासाठी ध्वनीप्रदूषणाच्या नियमांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर लागू कायद्यांनुसार पुढील कारवाईही केली जाईल.

न्यायालयाच्या निर्देशांनुसार, परवानगी घेतलेल्या मंडळांना ती परवानगी सार्वजनिकपणे दिसेल अशा ठिकाणी लावावी लागणार आहे. त्यासोबत उत्सव किंवा मिरवणुकीची जबाबदारी असलेल्या व्यक्तींची नावे, पत्ते आणि मोबाईल क्रमांकही प्रदर्शित करावे लागतील. त्यामुळे ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास जबाबदारी निश्चित करणे प्रशासनाला शक्य होणार आहे.

Tukaram Mundhe : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या आवाहनाला तुकाराम मुंढेंचा दुजोरा

याशिवाय ध्वनिव्यवस्थेत ध्वनीमर्यादा नियंत्रित करणारी यंत्रणा बसवण्याची अटही लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मिरवणूक सुरू होण्यापूर्वी पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने आयोजकांना ध्वनीमर्यादा व त्यांच्या कायदेशीर जबाबदाऱ्यांची जाणीव करून द्यावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे. एकाच परिसरात अनेक कार्यक्रमांना परवानगी दिल्यास त्यांच्या एकत्रित ध्वनीप्रभावाचाही विचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, धार्मिक मिरवणुकांमध्ये फटाके, लेझर लाईट, उच्च क्षमतेचे ध्वनिक्षेपक, मोठ्या आवाजातील संगीत तसेच ध्वनीप्रदूषण करणाऱ्या वाद्यांच्या वापराबाबतही न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. सार्वजनिक रस्ते आणि ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी घालण्याचे निर्देश देण्यात आले असून, मिरवणुकांमध्ये ध्वनीप्रदूषण करणाऱ्या काही साधनांच्या वापरावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.

Omraje Vs Rana Jagjit Sinha : मुख्यमंत्र्यांच्या गाडीत कट्टर राजकीय विरोधक आमनेसामने !

गणेशोत्सव आणि आगामी धार्मिक उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश महत्त्वाचे मानले जात आहेत. ध्वनीप्रदूषणाचे नियम केवळ कागदावर न राहता त्यांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी भूमिका न्यायालयाने घेतली आहे. या आदेशाची महाराष्ट्रातील संबंधित प्रशासन आणि पोलिस यंत्रणांना तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी माहिती देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

error: Content is protected !!