आमदार परिणय फुके यांचा काँग्रेसवर घणाघात
Nagpur मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्रचनेची प्रक्रिया सुरू असताना काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल गुडधे झोपले होते काय? असा खडा सवाल उपस्थित करत भाजप आमदार डॉ. परिणय फुके यांनी काँग्रेस नेत्यांवर जोरदार टीका केली. निवडणूक जिंकता येत नसल्यामुळे घटनात्मक संस्थांवर बेछूट आरोप करण्याचा अजेंडाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हाती घेतल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.
‘एसआयआर’च्या विरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी देशभरात आंदोलन छेडले आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत आमदार फुके म्हणाले, मतदार याद्यांच्या शुद्धीकरणासाठी निवडणूक आयोगाने सर्वच राजकीय पक्षांना बीएलए नेमण्याचे आवाहन केले होते. रीतसर अर्ज भरून मतदारांची नावे नोंदवण्याची ती संधी होती. सुमारे चार महिने ही प्रक्रिया सुरू होती, मात्र काँग्रेसने बीएलओ नेमलेच नाहीत. आता यादीत नावे दिसत नाहीत हे पाहून काँग्रेसने ओरड सुरू केली आहे.
तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन निवडणूक आयोगाचे प्रवक्ते म्हणून काम करावे !
याउलट, भाजपच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत गांभीर्याने अधिकाधिक मतदारांची नोंदणी करून घेतली. हे यश पाहूनच काँग्रेस आता हवालदिल होऊन आरोप करत आहे, असा टोला फुके यांनी लगावला. ते पुढे म्हणाले, प्रारूप मतदार यादी ही अंतिम नसते. ज्यांची नावे सुटली आहेत, त्यांना ती समाविष्ट करण्याची पूर्ण संधी निवडणूक आयोगाने दिली आहे. स्थानिक रहिवासी असल्याच्या पुराव्यासह फॉर्म भरून देणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.
ईव्हीएम आणि संवैधानिक संस्थांवरील आरोपांचा समाचार घेताना फुके म्हणाले, या देशात ईव्हीएम काँग्रेसनेच आणले.
नागपूर कराराची मूर्तिजापुरात होळी; स्वतंत्र विदर्भाच्या घोषणा
जोपर्यंत ते जिंकत होते, तोपर्यंत ईव्हीएम चांगले होते. आता पराभव दिसायला लागल्यावर विरोध सुरू झाला आहे. काँग्रेसचे नेते परकीय ताकदींचे एजंट आहेत की काय, अशी शंका येते. राहुल गांधींच्या माध्यमातून देशात डाव्या विचारसरणीचा प्रभाव वाढवून अराजकता माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी न्यायालय, सर्व तपास यंत्रणा आणि निवडणूक आयोगावर खोटे आरोप करून लोकांची दिशाभूल केली जात आहे, असा घणाघात फुके यांनी केला. या पत्रकार परिषदेला भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, नगरसेवक श्रीकांत आगलावे, विष्णू चांदे आणि रितेश गावंडे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.








