व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण ‘मत चोरी’च्या आरोपावरून काँग्रेसचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले

‘मत चोरी’च्या आरोपावरून काँग्रेसचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले

ज्ञानेश कुमार यांना बडतर्फ करून अटक करण्याची मागणी

Akola ‘एसआयआर’च्या माध्यमातून मतदारांची नावे वगळून ‘मत चोरी’ केली जात असल्याचा आरोप करीत काँग्रेसने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. आमदार साजिद खान पठाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सेवेतून बडतर्फ करून अटक करण्याची मागणी करण्यात आली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार झालेल्या या आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

‘मतदाराचे नावच यादीतून काढणार असाल, तर मतदानाचा अधिकार कुठे राहिला?’ असा थेट सवाल करीत काँग्रेसने एसआयआर प्रक्रियेवर जोरदार आक्षेप घेतला. निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थेच्या कारभारात पारदर्शकता राहिलेली नसल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्ताचा हवाला देत काँग्रेसने निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी मागील दहा महिन्यांत किमान १४ वेळा काही निर्णयांवर औपचारिक आक्षेप नोंदविल्याचे म्हटले आहे. एसआयआर प्रक्रिया, नवीन मतदारांची नोंदणी, मतदारांची नावे वगळणे तसेच निवडणूक आयोगाच्या आयटी प्रणालीच्या केंद्रीकरणासारख्या मुद्द्यांचा त्यात समावेश असल्याचे वृत्त आहे.

हिवाळी अधिवेशनाचा निधी स्वतःच्या विश्रामगृहावर उधळला, सा.बां. विभागाचा कारभार चव्हाट्यावर

या पार्श्वभूमीवर एसआयआर प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा पारदर्शक करावा, मतदारांची नावे वगळण्यापूर्वी योग्य पडताळणी करावी आणि मतदार यादीतील बदलांचा संपूर्ण तपशील सार्वजनिक करावा, अशी मागणी काँग्रेसने केली.

‘निवडणूक आयोगाला जाब द्यावाच लागेल’

पश्चिम बंगाल आणि बिहारमधील मतदार यादीच्या प्रक्रियेचा संदर्भ देत काँग्रेसने मतदारांची मोठ्या प्रमाणावर नावे वगळली जात असल्याचा आरोप केला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही मतदारसंख्या व नोंदणीतील कथित अनियमिततेचे मुद्दे विरोधकांनी उपस्थित केले होते. राहुल गांधी यांनी यापूर्वी निवडणूक प्रक्रियेबाबत केलेल्या आरोपांचाही निवेदनात उल्लेख करण्यात आला.

काँग्रेसच्या मते, निवडणूक आयोगाची विश्वासार्हता ही लोकशाहीच्या विश्वासार्हतेशी जोडलेली आहे. त्यामुळे आयोगाच्या निर्णय प्रक्रियेबाबत निर्माण झालेले प्रश्न टाळून चालणार नाहीत. एसआयआर प्रक्रियेबाबत जनतेसमोर स्पष्टता आणण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

विधानसभेनंतरची लढाई आता शेतकरी बँकेच्या दारात, बच्चू कडू- प्रवीण तायडे सामना रंगणार

दरम्यान, निवडणूक आयोगाने आयोगातील निर्णय एकमताने होत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे SIRच्या मुद्द्यावरून काँग्रेसने उपस्थित केलेले प्रश्न आणि आयोगाची भूमिका यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी दहा महिन्यांत किमान १४ वेळा काही निर्णयांवर औपचारिक आक्षेप नोंदविल्याचे समोर आले आहे. एसआयआर, मतदारांची नावे वगळणे, नवीन मतदारांची नोंदणी आणि आयटी प्रणालीच्या केंद्रीकरणाशी संबंधित बाबींचा त्यात समावेश असल्याचे वृत्त आहे. मात्र, निवडणूक आयोगाने निर्णय एकमताने होत असल्याचे स्पष्ट केले आहे.

 

error: Content is protected !!