शिंदेसेनेत सरनाईक-देशपांडे यांच्यात दावेदारी; भाजपकडूनही संगीता शिंदे, शेखर भोयर यांची नावे चर्चेत
Amravati विधान परिषदेच्या अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची सूचना मंगळवारी (दि. २९) प्रसिद्ध झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील घटक पक्षांमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू झाली असून, काँग्रेसकडून प्रा. अदिती ऋषिकेश पोहरे यांच्या नावाची चर्चा आहे. दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटात विद्यमान आमदार किरण सरनाईक आणि माजी आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे हे दोघेही इच्छुक असल्याने पक्षाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. भाजपकडूनही संगीता शिंदे आणि शेखर भोयर यांच्यासह काही नावे चर्चेत आहेत.
अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघात अमरावतीसह अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश होतो. निवडणुकीची अधिकृत सूचना प्रसिद्ध झाल्याने आता इच्छुकांकडून मतदारांशी संपर्क आणि मोर्चेबांधणीला वेग येण्याची शक्यता आहे.
काँग्रेसकडून अदिती पोहरे यांचे नाव
काँग्रेसकडून प्रा. अदिती ऋषिकेश पोहरे निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्या माजी कृषिमंत्री हर्षवर्धन ऊर्फ भैय्यासाहेब देशमुख यांच्या कन्या आहेत. त्यांच्या संभाव्य उमेदवारीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.
शिंदेसेनेत दोन दावेदार
विद्यमान आमदार किरण सरनाईक यांनी २०२० मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक जिंकली होती. सध्या ते शिवसेना शिंदे गटाशी जोडले गेले असून याच पक्षाकडून पुन्हा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यांच्यासोबत माजी आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे यांचेही नाव चर्चेत आहे. देशपांडे यांनीही शिंदे गटाकडून निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे या दोघांपैकी पक्ष कोणाला उमेदवारी देतो, याकडे लक्ष लागले आहे.
भाजपमध्येही इच्छुकांची गर्दी
भाजपकडूनही या जागेवर दावेदारी करण्यात येत आहे. संगीता शिंदे, शेखर भोयर आणि अन्य काही इच्छुकांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे राहणार की भाजपकडे जाणार, याबाबतचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
२०२० मध्ये झाली होती बहुरंगी लढत
२०२०च्या निवडणुकीत अमरावती शिक्षक मतदारसंघात एकूण २७ उमेदवार रिंगणात होते. अपक्ष किरण सरनाईक यांनी १५ हजार ६०६ मते मिळवत विजय मिळविला, तर प्रा. श्रीकांत देशपांडे यांना ९ हजार १९१ मते मिळाली. त्या निवडणुकीत विविध शिक्षक संघटना आणि राजकीय पक्षांशी संबंधित उमेदवार मैदानात असल्याने मतविभाजन झाले होते.
शिक्षक संघटनांची भूमिकाही महत्त्वाची
यंदाच्या निवडणुकीत राजकीय पक्षांसोबतच विविध शिक्षक संघटनांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. विज्युक्टा, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षक भारती, शिक्षक आघाडी, नुटा यांसह अन्य संघटनांच्या भूमिकेकडे राजकीय पक्षांचे लक्ष असेल. उमेदवारी निश्चित झाल्यानंतर या संघटनांच्या भूमिकेमुळे निवडणुकीतील समीकरणांना वेगळी दिशा मिळू शकते.
जागावाटपाचा निर्णय ठरणार महत्त्वाचा
अमरावती शिक्षक मतदारसंघासह विधान परिषदेच्या अन्य शिक्षक व पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून जागावाटप आणि उमेदवारीबाबत चर्चा सुरू झाली आहे. अमरावतीची जागा कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाते आणि संबंधित पक्ष कोणाला उमेदवारी देतो, यावर पुढील राजकीय हालचाली अवलंबून राहणार आहेत.








