आता उमेदवाराच्या घोषणेकडे लक्ष, ६ ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत
Amravati विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या जागेवर महायुतीत भाजपचा दावा संपुष्टात आल्याचे चित्र आहे. हा मतदारसंघ शिवसेना (शिंदे गट)च्या वाट्याला जाणार असल्याचे भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार डॉ. संजय कुटे यांनी मंगळवारी सांगितले. त्यामुळे आता महायुतीकडून शिवसेनेचा उमेदवार कोण असणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, शिवसेनेकडून अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. विद्यमान आमदार किरण सरनाईक आणि मागील निवडणुकीत पराभूत झालेले माजी आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे यांनी निवडणूक लढविण्याची तयारी स्पष्ट केली आहे. दोघांनीही आपली उमेदवारी जाहीर केल्याने आता पक्षाकडून कोणाला अधिकृत पाठिंबा मिळतो, याची उत्सुकता आहे.
यशोमती ठाकूर यांच्या घरावर ड्रोनच्या घिरट्या; जीवाला धोका असल्याचा दावा
शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
शिवसेनेच्या उमेदवारीबाबत अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे घेणार असून, येत्या एक-दोन दिवसांत उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
प्रा. श्रीकांत देशपांडे यांनी यापूर्वी शिवसेनेच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवली होती. दुसरीकडे, किरण सरनाईक यांनी २०२० मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवून विजय मिळवला होता. त्यांनी अलीकडेच शिवसेना (शिंदे गट)मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे पक्षाचा पारंपरिक चेहरा असलेले प्रा. देशपांडे की विद्यमान आमदार सरनाईक, यापैकी कोणाच्या नावावर पक्ष शिक्कामोर्तब करणार, याकडे लक्ष लागले आहे.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २९ सप्टेंबरपासून सुरू झाली असून, ६ ऑक्टोबर ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. २३ ऑक्टोबर रोजी मतदान, तर २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
‘माझ्या मतदारसंघात ५० हजार बोगस मतदार’; संजय गायकवाडांचा खळबळजनक दावा
२०२०च्या निवडणुकीत किरण सरनाईक यांनी १५ हजार ६०६ मते मिळवत विजय मिळवला होता, तर प्रा. श्रीकांत देशपांडे यांना ९ हजार १९१ मते मिळाली होती. त्यामुळे यंदा दोघांपैकी कोणाला शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी मिळते, हे निवडणुकीतील महत्त्वाचे समीकरण ठरणार आहे.








