प्रस्तावित जागेच्या राजकीय वादावर अखेर पडदा
Wardha : देवळी नगरपरिषदेच्या हद्दीत प्रस्तावित असलेल्या नमो उद्यानाच्या जागेवरून निर्माण झालेल्या राजकीय वादावर अखेर पडदा पडला आहे. नागपूर विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक विजयालक्ष्मी बिदरी यांनी भाजपचे आठ आणि काँग्रेसचे तीन अशा एकूण ११ नगरसेवकांनी दाखल केलेली पुनरीक्षण याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी दिलेला निर्णय कायम राहिला असून, नमो उद्यानाच्या नियोजित जागेवरील कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
देवळी येथे शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नमो उद्यान विकसित करण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. वर्धा रोडवरील शेत सर्व्हे क्रमांक ५९७, बाला लेआऊट परिसरातील सुमारे ४ हजार ८३७ चौरस मीटर जागेवर हे उद्यान उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी तांत्रिक तसेच प्रशासकीय मान्यता घेण्यात आली होती. त्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रस्ताव नगरपरिषदेच्या स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला.
मात्र, उद्यानासाठी निवडलेल्या जागेवरून स्थायी समितीतील सदस्यांमध्ये मतभेद निर्माण झाले. त्यानंतर हा विषय विशेष सभेत मांडण्यात आला. भाजप आणि काँग्रेसच्या ११ नगरसेवकांचे बहुमत असल्याने त्यांनी प्रस्तावाला मंजुरी देण्याऐवजी नियोजित जागेवर आक्षेप घेत जागा बदलण्याची मागणी केली. बहुमताच्या आधारे उद्यानाचा प्रस्ताव नामंजूर करण्याचा ठरावही करण्यात आला.
हजारो कोटींच्या जाहिराती, पण ११ चिमुकल्यांसाठी सुरक्षित वाहन नाही!
या ठरावाला नगरपरिषदेच्या तत्कालीन मुख्याधिकारी नेहा आकोडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आव्हान दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष सभेत पारित झालेल्या ठरावाला स्थगिती दिली. या निर्णयाविरोधात नगरसेवक उमेश कामडी यांच्यासह अन्य दहा नगरसेवकांनी महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियमातील कलम ३०८ अंतर्गत नागपूर विभागीय आयुक्तांकडे पुनरीक्षण अर्ज दाखल केला.
अर्जदारांनी नियोजित जागेवर सुमारे ८८ लाख रुपये खर्च करणे म्हणजे सार्वजनिक निधीचा अपव्यय ठरेल, असा युक्तिवाद केला होता. मात्र, मुख्याधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालासह उपलब्ध कागदपत्रांचा विचार करून विभागीय आयुक्तांनी संबंधित आक्षेप फेटाळले. तसेच राज्य शासनाच्या लोकहिताच्या उपक्रमाच्या अंमलबजावणीत अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने कार्यवाही झाल्याचे निरीक्षण नोंदवत नगरसेवकांच्या भूमिकेवरही ताशेरे ओढले.
ज्ञानेशकुमारांसोबत मोदींनाही हटवा; नाना पटोलेंचा नागपुरातून हल्लाबोल
१५ जून २०२६ रोजी जिल्हाधिकारी, वर्धा यांनी दिलेला तहकुबीचा आदेश विभागीय आयुक्तांनी कायम ठेवला आहे. त्यामुळे आता वर्धा रोडवरील निश्चित जागेवरच नमो उद्यान उभारणीसाठी पुढील प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग स्पष्ट झाला आहे. या निर्णयामुळे देवळीतील राजकीय वादाला नवे वळण मिळाले असून, शासनाच्या मंजूर निधीतून उद्यान प्रत्यक्षात साकारण्याची शक्यता निर्माण झाली आहे.








