व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण अमरावतीची लेक, अकोल्याची सून आता काँग्रेसच्या मैदानात

अमरावतीची लेक, अकोल्याची सून आता काँग्रेसच्या मैदानात

आदिती पोहरे यांचा पक्षप्रवेश, शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी जाहीर

Akola माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या कन्या आणि ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे यांच्या सून प्रा. आदिती ऋषिकेश पोहरे यांनी गुरुवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईतील टिळक भवन येथे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. पक्षप्रवेशानंतर काँग्रेसने त्यांना अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघातून विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली.

अमरावतीची लेक आणि अकोल्याची सून अशी ओळख असलेल्या आदिती पोहरे यांच्या राजकीय प्रवेशामुळे अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीला नवे वळण मिळाले आहे. या मतदारसंघात अमरावतीसह अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.

टिळक भवनात काँग्रेसचा हात हाती

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खासदार मुकुल वासनिक, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, नसीम खान, यशोमती ठाकूर, खासदार प्रणिती शिंदे, खासदार कल्याण काळे, खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आदिती पोहरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पोहरे यांचे पक्षात स्वागत केले. काँग्रेसचा विचार घराघरात पोहोचवण्यासाठी काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

कोहळे की सोले? भाजपात उमेदवारीवरून कमालीची अस्वस्थता; देवाभाऊंच्या मनात नेमकं काय?

देशमुख-पोहरे कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी

प्रा. आदिती पोहरे या माजी मंत्री तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन ऊर्फ भैय्यासाहेब देशमुख यांच्या कन्या आहेत. त्या अकोल्यातील ज्येष्ठ पत्रकार तथा ‘देशोन्नती’चे संस्थापक-संपादक प्रकाश पोहरे यांच्या सून आहेत. त्यामुळे अमरावती आणि अकोला या दोन्ही जिल्ह्यांशी त्यांचा कौटुंबिक संबंध आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे या पाच जिल्ह्यांच्या शिक्षक मतदारसंघातील राजकीय समीकरणांकडे लक्ष लागले आहे.

अभियांत्रिकी आणि मानसशास्त्राचे शिक्षण

आदिती पोहरे यांनी अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून एम.ई. (स्ट्रक्चरल डिझाईन) आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून एम.ए. (मानसशास्त्र) पदवी विशेष प्राविण्यासह प्राप्त केली आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील अध्यापनाचा अनुभवही त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीचा भाग आहे.

शिंदे सेनेचे ७ पदाधिकारी निघाले खंडणीखोर; १२ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

काँग्रेसकडून पहिली उमेदवारी

अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने आदिती पोहरे यांचे नाव जाहीर केले आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करणारा काँग्रेस हा पहिल्या प्रमुख पक्षांपैकी एक ठरला आहे. निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान, तर २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.

दरम्यान, अमरावती शिक्षक मतदारसंघातून विविध पक्षांकडून इच्छुकांची नावे चर्चेत असताना आदिती पोहरे यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

 

error: Content is protected !!