व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण फडणविसांच्या मनाप्रमाणेच झाले, भाजपकडून सुधाकर कोहळे यांच्या नावावर मोहर

फडणविसांच्या मनाप्रमाणेच झाले, भाजपकडून सुधाकर कोहळे यांच्या नावावर मोहर

पदवीधर निवडणुकीत काँग्रेसच्या अभिजित वंजारींशी रंगणार थेट लढत, अनिल सोलेंच्या भूमिकेकडे लक्ष

Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघासाठी भाजपचा उमेदवार कोण, यावर गेल्या काही दिवसांपासून ताणला गेलेला उत्सुकतेचा पडदा अखेर उघडला आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केलेल्या यादीत माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात उपस्थित असतानाच ही घोषणा झाल्याने आता माजी आमदार अनिल सोले यांच्या पुढील भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

भाजपने वर्षभरापूर्वी नोंदणी प्रमुख म्हणून जबाबदारी दिल्यानंतर कोहळे यांनी ताकदीने मतदार नोंदणीचा धडाका लावला होता. दुसरीकडे, अनिल सोले यांनीही जोरदार प्रचार मोहीम राबवून वाढदिवसाच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शन केले होते. या सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते, मात्र शहरात असूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती. फडणवीसांच्या याच अनुपस्थितीने सोले यांच्या उमेदवारीबाबतचा स्पष्ट संकेत दिला होता, जो आज खरा ठरला.

गडचिरोलीच्या वनसंपदेतून गावांच्या विकासाला नवा निधी?

 

नितीन गडकरी आणि गंगाधरराव फडणवीस यांनी नेतृत्व केलेला हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, गेल्या निवडणुकीत अनिल सोले यांचे तिकीट कापून संदीप जोशी यांना उमेदवारी देण्याचा निर्णय भाजपच्या अंगलट आला होता. काँग्रेसचे महाविकास आघाडीचे अभिजित वंजारी यांनी संदीप जोशींचा पराभव करत भाजपच्या या मजबूत किल्ल्याला सुरुंग लावला होता.

मोदींना बॅग पॅक करावी लागेल; ठाकरे बंधुंच्या मोर्च्यापूर्वी संजय राऊतांचा मोठा दावा

त्या ऐतिहासिक पराभवातून धडा घेत भाजपने यंदा कोणतीही रिस्क न घेता सुधाकर कोहळे यांच्यावर विश्वास दाखवला आहे. कोहळे यांनी यापूर्वी दक्षिण नागपूरचे प्रतिनिधित्व केले असून त्यांनी नागपूर शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांचे अध्यक्षपद सांभाळले आहे. आपल्या वडिलांचा हा पारंपरिक मतदारसंघ पुन्हा भाजपच्या पदरात पाडून देण्याच्या अटीवरच फडणवीसांनी कोहळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे समजते. आता या मतदारसंघात सुधाकर कोहळे विरुद्ध अभिजित वंजारी अशी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

 

error: Content is protected !!