अकोल्यात नगरसेवकाला अटक; हॉटेल कॅशियरला मारहाण केल्याचा आरोप
Akola गेल्याच आठवड्यात नागपुरात शिंदेसेनेच्या सात पदाधिकाऱ्यांवर १२ लाखांची खंडणी मागितल्याच्या आरोपात गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण ताजे असतानाच आता शिंदेंचा अकोल्यातील नगरसेवकही खंडणीबहाद्दर निघाल्याचं उघडकीस आलं आहे. शिवसेनेत सध्या खंडणीची मालिका सुरू असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे.
बस स्थानक परिसरातील कृष्णा इम्पेरियल हाॅटेलच्या कॅशियरला शिवीगाळ व मारहाण केल्याचा तसेच हॉटेलचा व्यवसाय सुरू ठेवायचा असेल तर १५ लाख रुपये खंडणी मागितल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक सागर भारुका यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी भारुका यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.
३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२ ते सव्वा बाराच्या सुमारास सागर भारुका हे काही मित्रांसह मध्यवर्ती बसस्थानकाच्या मागील परिसरातील कृष्णा इम्पेरियल हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. यावेळी त्यांनी हॉटेलमधील कॅशियर शोएब जमील अख्तर यांच्याकडे जेवणाची मागणी केली. त्यानंतर काही कारणावरून भारुका आणि कॅशियर यांच्यात वाद झाला.
तक्रारीनुसार, सुरुवातीला झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. त्यानंतर हॉटेल आपल्या प्रभागात येत असल्याचे सांगून व्यवसाय सुरू ठेवायचा असेल तर १५ लाख रुपये द्यावे लागतील, अशी धमकी दिल्याचा आरोप कॅशियरने केला आहे.
घटनेनंतर कॅशियर शोएब अख्तर यांनी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी सागर भारुका यांच्याविरुद्ध खंडणीची मागणी, धमकावणे, शिवीगाळ आणि मारहाण केल्याच्या आरोपांवरून गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल होताच सिव्हिल लाइन्स पोलिसांनी नगरसेवक सागर भारुका यांना ताब्यात घेतले. या प्रकरणातील पुढील कारवाई सुरू असून, ५ ऑक्टोबर रोजी आरोपी भारुका यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यापूर्वी भारुका यांची रविवारी रात्री उशिरा रुग्णालयात आरोग्य तपासणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
फडणविसांच्या मनाप्रमाणेच झाले, भाजपकडून सुधाकर कोहळे यांच्या नावावर मोहर
नेमका वाद कशावरून? पोलीस तपास सुरू
हॉटेलमध्ये नेमका वाद कोणत्या कारणावरून सुरू झाला, १५ लाख रुपयांची मागणी प्रत्यक्षात करण्यात आली का, तसेच मारहाणीच्या आरोपांमागील वस्तुस्थिती काय आहे, याचा पोलीस तपास सुरू आहे.








